पप्पू अखेर २४व्या प्रयत्नांत पास!

५६व्या वर्षी झाले गणितातील द्विपदवीधर

पप्पू अखेर २४व्या प्रयत्नांत पास!

त्यांनी अखेर करून दाखवले. त्यांच्याकडे ना घर आहे, ना कुटुंब, ना गाठीला पैसा किंवा कायमची नोकरीदेखील नाही. ‘पण माझ्याकडे डिग्री आहे,’ असे जबलपूरमधील राजकरण बरुआ मोठ्या अभिमानाने सांगू शकतात. त्यांना गणित विषयात एमएससी करण्यासाठी तब्बल २५ वर्षे लागली.

गणितामध्ये मास्टर डिग्री मिळवण्यासाठी राजकरण (५६) यांनी आपल्या आयुष्याची अर्धी हयात घालवली. ते २३ वेळा अनुत्तीर्ण झाले. या दरम्यान त्यांनी सुरक्षारक्षक म्हणून दोन शिफ्टमध्ये काम केले आणि कितीतरी नोकऱ्या केल्या, याची गणतीच नाही. मात्र त्यांनी त्यांचे मास्टर्स डिग्री मिळवण्याचे स्वप्न कायमच उराशी बाळगले आणि अखेर ते सन २०२१मध्य उत्तीर्ण झाले. मात्र त्यांनी याबाबत कुठेच वाच्यता केली नव्हती.

‘मी माझा हा आनंद माझ्या घरात एकट्यानेच साजरा केला. मी बाहेर कोणालाही हे सांगू शकत नव्हतो. माझ्या मालकांनी त्यांच्या मुलांना माझे उदाहरण देऊन मला चिडवले असते. या वयातही माझा दृढनिश्चय आणि कठोर मेहनतीचा दाखलाही त्यांनी दिला असता. मात्र मला त्यांना खजिल करायचे नव्हते. त्यामुळे हा आनंद मी शांततेने आणि माझ्यापुरताच साजरा केला. आता मात्र मी ही नोकरी सोडली असल्याने मी लोकांना मोकळेपणाने सांगू शकतो,’ असे राजकरण यांनी सांगितले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये सन २०१५मध्ये आलेल्या त्यांच्यावर आलेल्या बातमीने त्यांना प्रोत्साहन मिळाल्याचे राजकरण सांगतात.

‘मी १८व्यांदा अनुत्तीर्ण झालो, तेव्हा मला अगदी निराश वाटले होते. मात्र माझी बातमी प्रसिद्ध होताच, लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागले. टीव्ही वाहिन्या माझ्याकडे येऊ लागल्या, माझ्या मुलाखती घेऊ लागल्या. त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले,’ असे राजकरण यांनी सांगितले.राजकरण हे एका बंगल्यावर रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. यासाठी त्यांना दर महिना पाच हजार रुपये मिळतात. तिथेच जेवण आणि राहात असल्याने ते तिथे अन्य मदतही करतात आणि त्यासाठी त्यांना दर महिना दीड हजार रुपये मिळतात.

हे ही वाचा:

ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक

श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली

वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली

बोगद्यात अडकलेल्या मजूरांच्या मानसिक आरोग्यावर स्वदेशी ‘रोबो’ लक्ष ठेवणार

‘मी माझ्या जगण्यापुरते जेमतेम पैसे कमावतो. गेल्या २५ वर्षांत गणितात एमएसी मिळवण्यासाठी मी पुस्तके, परीक्षा शुल्क आणि अन्य खर्च म्हणून तब्बल दोन लाख रुपये खर्च केले आहेत. मला केवळ ही परीक्षा उत्तीर्ण करायची होती आणि गणितात द्विपदवीधर व्हायचे होते,’ असे ते सांगतात. त्यांनी विवाह केलेला नाही. ‘माझ्याशी कोण लग्न करणार? मी माझ्या स्वप्नाशीच विवाह केला आहे,’ त्यांचे उत्तर तयार असते.

राजकरण यांनी त्यांच्या डिग्रीच्या हव्यासाबद्दल स्पष्टीकरण दिले. ‘सन १९९६मध्ये एमए केल्यानंतर मी शाळेत गेलो. तिथळ्या मुलांशी गप्पा मारल्या. मी ज्या प्रकारे मुलांना गणित शिकवले, त्याचे शिक्षकांनी कौतुक केले. त्यामुळे माझ्यात गणितात द्विपदवीधर होण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. त्या वेळी तुम्हाला एमएससी कोणत्याही विषयात करण्याची परवानगी होती. मी जबलपूरच्या राणी दुर्गावती विद्यापीठातून गणितात एमएससी करण्यासाठी अर्ज केला आणि तो सन १९९६मध्ये मंजूर झाला. मात्र ही पदवी मिळवणे एवढे कठीण असेल आणि त्यासाठी त्यांना २५ वर्षांची ‘तपस्या’ करावी लागेल, याची त्यांना सूतराम कल्पना नव्हती.

‘माझ्यात एवढी चिकाटी आहे, याची मलाही कल्पना नव्हती,’ असे ते हसून सांगतात.
‘सन १९९७मध्ये मी पहिल्यांदा माझी एमएसीची परीक्षा दिली आणि अनुत्तीर्ण झालो. पुढील १० वर्षे मी केवळ पाचपैकी एका विषयातच उत्तीर्ण झालो. परंतु मी धीर सोडला नाही. लोक काय बोलतात, याकडे मी लक्ष दिले नाही आणि मी माझ्या स्वप्नांवरच लक्ष केंद्रित केले. त्यानंतर मी दोन विषयात उत्तीर्ण होऊ लागलो. अखेर सन २०२०मध्ये करोनाकाळात मी पहिल्या वर्षात उत्तीर्ण झालो आणि सन २०२१मध्ये मी दुसरे वर्षही यशस्वीपणे उत्तीर्ण केले,’ असे ते सांगतात. सातत्यपूर्ण मेहनत आणि संयम असला की सर्व काही साध्य होते, यावर त्यांचा विश्वास आहे आणि तोच त्यांनी सार्थ करून दाखवला आहे.

Exit mobile version