देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले. पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ८३ व्या वर्षी निधन झाले. रविवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. दिल्ली येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौ येथे झाला. बिरजू महाराज हे शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.
हे ही वाचा:
संगीतद्वेष्ट्या तालिबान्यांनी भरचौकात जाळली वाद्ये!
छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी कोणाची परवानगी हवीच कशाला?
मिराबाई चानू आता उचलणार अतिरिक्त पोलिस अधीक्षकाचा भार
दिल्लीत गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक हुडहुडी भरविणारा दिवस
सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटात त्यांनी संगीत दिले होते. देढ इश्किया, उमराव जान, देवदास आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केले होते. बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती. तसेच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला होता.