जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावरही दिसून आला आहे. पाकिस्तानच्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. पहिल्या पाच मिनिटांत पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (पीएसएक्स) ११४,७४०.२९ अंकांवर घसरल्याचे पाहायला मिळाले.
भारताने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या निर्णयात सिंधु पाणी करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद, पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश, अटारी वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद, भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचे आदेश, यांचा समावेश आहे. याचबरोबर भारताने पाकिस्तानचे अधिकृत ‘एक्स’ अकाउंट बंद केले आहे. आता पाकिस्तानचे खाते भारतात दिसणार नाही. भारताने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या सर्व निर्णयांचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावरही दिसून आला.
गुरुवारी (२४ एप्रिल) सकाळी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजचा (PSX) मुख्य निर्देशांक, केएसई-१००, मध्ये मोठी घसरण झाली. बाजार उघडताच, सुरुवातीच्या व्यवहारात तो २.१२ टक्क्यांनी म्हणजेच २,४८५.८५ अंकांनी घसरला आणि ११४,७४०.२९ अंकांवर पोहोचला. बुधवारी (२३ एप्रिल) देखील पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. कराची स्टॉक एक्सचेंज (केएसई-१०० इंडेक्स) १,३०३.२९ अंकांनी घसरून १,१७,१२७.०६ वर बंद झाला.
कराचीतील एका वरिष्ठ बाजार विश्लेषकाने सांगितले की, ‘भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये हा एक मोठा वळणाचा टप्पा आहे. गुंतवणूकदारांना भीती आहे की तणाव आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत ते जोखीम घेण्याचे टाळत आहेत आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाटचाल करत आहेत. या भीतीमुळे शेअर्सची विक्री सुरू झाली आणि त्याचा परिणाम बाजारात घसरणीच्या स्वरूपात दिसून आला.
हे ही वाचा :
सिंधू जल कराराचे स्थगन योग्य दिशेने उचललेले पाऊल
आम्ही एनडीएसोबत होतो आणि पुढेही राहू
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट भारतात रिलीज होणार नाही
डिजिलॉकरमुळे खेळाडूंना मोठा दिलासा
बाजारातील घसरणीचा परिणाम सर्व प्रमुख क्षेत्रांवर दिसून येत आहे. बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक तोटा दिसून येत आहे. वाणिज्य बँकांच्या निर्देशांकात ६९९.०२ अंकांची घसरण दिसून आली. त्याचप्रमाणे तेल आणि वायू क्षेत्रातही ३१२.७६ अंकांची घसरण दिसून आली. पाकिस्तानच्या शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण पुढील काही दिवस कायम राहू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाला नाही तर बाजारावर दबाव येईल, असा इशारा एका विश्लेषकाने दिला आहे.