पाकिस्तानच्या सीमा हैदरला हवे भारतीय नागरिकत्व !

थेट राष्ट्रपतींपुढे केली याचिका

पाकिस्तानच्या सीमा हैदरला हवे भारतीय नागरिकत्व !

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडातील सचिन मीना याच्या प्रेमात पडून पाकिस्तानमधून अवैध मार्गाने पळून आलेली, चार मुलांची आई सीमा हैदर हिला भारतीय नागरिकत्व हवे आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परवानगी द्यावी, यासाठी तिने शनिवारी याचिका दाखल केली आहे.सीमा हैदर हिने राष्ट्रपतींकडे तिला आणि तिच्या मुलांना तिचा प्रियकर सचिन मीना याच्यासोबत राहण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे. सीमा हैदरच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एपी सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेत राष्ट्रपतींकडून या प्रकरणाची तोंडी सुनावणी घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याचिकाकर्तीला सचिन मीना तसेच, त्याच्या आई-वडिलांकडून शांती, प्रेम आणि आनंदाची भावना मिळाली आहे, जी तिने यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती, असे नमूद करून राष्ट्रपतींनी दया दाखवल्यास, याचिकाकर्ता तिचे उर्वरित वैवाहिक आयुष्य तिच्या पतीसोबत, चार अल्पवयीन मुलांसोबत व्यतीत करेल, अशी आशा व्यक्त केली आहे. याचिकाकर्ती अल्पशिक्षित असून तिच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन यात करण्यात आले आहे. तिला येथे राहण्याची परवानगी दिल्यास तिला काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल आणि तिच्या वैवाहिक आयुष्याला सामर्थ्य मिळेल, असे याचिकेत म्हटले आहे.

हे ही वाचा:

रक्तदान शिबिराने सुरू झाला सेवासप्ताह

कुटुंब रंगलंय गप्पात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाची पंतप्रधान मोदींनी केले आस्थेवाईक चौकशी

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात उधळली जाणारी हळद ‘सेंद्रिय’ असावी!

‘आदेश नसतानाही यासिन मलिकला न्यायालयात का आणले?’

याचिकेत तिने तिच्या प्रेमकथेचाही तपशील दिला आहे. ‘मी सचिन मीनाच्या प्रेमात आहे आणि आम्ही दोघांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले,’ असे सीमा हैदरने याचिकेत म्हटले आहे.
सीमा (३०) आणि सचिन (२२) हे दोघे सन २०१९मध्ये ऑनलाइन पब्जी गेम खेळत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर २०२३मध्ये सीमाने पाकिस्तान ते दुबई आणि नंतर नेपाळमार्गे भारतात अवैधरीत्या प्रवेश केला. सीमा हैदर हिचे पाकिस्तानी लष्कर किंवा आयएसआयशी संबंध नाहीत ना, या शक्यतांचा तपास एटीएस आणि आयबी करत आहेत.

Exit mobile version