आपल्या जलक्षेत्रात बेकायदेशीर मासेमारी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने १९९ भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. आता पाकिस्तान सद्भावनेच्या या सर्व मच्छीमारांची सुटका करण्याच्या विचारात आहे. या मच्छिमारांची शुक्रवार १२ मे पर्यंत सुटका होण्याची शक्यता आहे. परंतु त्याच दरम्यान एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या मच्छिमारांच्याबरोबर त्याचीही सुटका करण्यात येणार होती.
झुल्फिकार या भारतीय चा शनिवारी आजारपणामुळे कराची येथील रुग्णालयात मृत्यू झाला. मच्छिमारांसोबत झुल्फिकारलाही सोडण्यात येणार होते. या भारतीय कैद्याने खूप ताप आणि छातीत अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती. गेल्या आठवड्यात त्याची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला असे सिंधचे तुरुंग आणि सुधार विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी काझी नजीर यांनी सांगितले.
लांधी आणि मालीर तुरुंगात कैद्यांसाठी पुरेशी व्यवस्था आणि सुविधा नाहीत. येथे आजरी कैदी असून त्यांना उपचारासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप तुरुंगात मदत पुरवणाऱ्या ईधी वेलफेअर ट्रस्टने केला आहे. कारागृहातील डॉक्टर आणि रुग्णालयात गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी योग्य सुविधा आणि उपकरणे नाहीत आणि ते रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची शिफारस करतात परंतु बर्याच वेळा खूप उशीर झालेला असतो याकडेही लक्ष वेधले.
सध्या कराचीच्या लांधी आणि मलीर तुरुंगात ६३१ भारतीय मच्छिमार आणि एक अन्य कैदी त्यांची तुरुंगवासाची मुदत पूर्ण करूनही बंद आहेत असे पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसीने म्हटले आहे. या सर्व भारतीय मच्छिमारांना पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सागरी प्रादेशिक सीमांकन कराराचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते.
मच्छिमारांना वाघा सीमेवर ताब्यात देणार
त्यांना संबंधित सरकारी मंत्रालयांनी शुक्रवारी १९९ मच्छिमारांची सुटका करण्यास आणि त्यांच्या मायदेशी परत जाण्याची तयारी करण्यास सांगितले आहे. या मच्छिमारांना लाहोरला पाठवले जाईल आणि वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल असे वरिष्ठ पोलीस अधिकारी काझी नजीर यांनी सांगितले.