आशिया कप सुपर फोरमध्ये पाकिस्तानने केली भारताला परतफेड

पाच विकेट्सनी जिंकला सामना

आशिया कप सुपर फोरमध्ये पाकिस्तानने केली भारताला परतफेड

दुबई येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप टी-२० सुपर फोर लढतीत पाकिस्तानने भारतावर ५ विकेट्सनी मात केली. पहिल्या फेरीत भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सनी मात केली होती, त्याची परतफेड पाकिस्तानने केली. अखेरच्या षटकात पाकिस्तानला ७ धावांची गरज होती तर शेवटच्या २ चेंडूंत त्यांना २ धावा हव्या होत्या. तेव्हा पाकिस्तानच्या इफ्तिकारने दोन धावा घेत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्याला उत्तर देताना पाकिस्तानने १ चेंडू राखून ५ फलंदाजांच्या मोबदल्यात निर्धारित धावा केल्या. आता भारताची सुपर फोरमधील दुसरी लढत श्रीलंकेशी ६ सप्टेंबरला होत आहे. तर पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानशी होईल.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. भारताला त्यांनी १८१ धावांवर रोखले. विराट कोहलीने भारतातर्फे सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. त्याला इतरांची साथ मात्रा मिळाली नाही. के.एल. राहुल आणि रोहित शर्मा यांनी केलेल्या २८ धावा ही दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या ठरली. पाकिस्तानच्या नसीम शाह, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ, मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी १ तर शादाब खानने २ बळी घेतले.

भारताच्या या धावसंख्येला उत्तर देताना पाकिस्तानची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. बाबर आझम १४ धावांवर बाद झाल्यावर फखर झमानलाही १५ धावा करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती २ बाद ६३ अशी झाली होती. मात्र सलामीवीर मोहम्मद रिझवान (७१) आणि मोहम्मद नवाझ यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करून पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर रिझवानचा अडथळा हार्दिक पंड्याने दूर केला. त्यानंतर आसीफ अली (१६) आणि खुशदील शहा (१४) यांनी पाकिस्तानला विजयासमीप नेले. आसीफ अली पाकिस्तानच्या १८० धावा झालेल्या असताना अर्शदीप सिंगकडून बाद झाला. पण तोपर्यंत विजयाचे लक्ष्य टप्प्यात आले होते.

स्कोअरबोर्ड

भारत २० षटकांत ७ बाद १८१ (राहुल २८, रोहित शर्मा २८, विराट कोहली ६०) पराभूत वि. पाकिस्तान ५ बाद १८२ (रिझवान ७१, मोहम्मद नवाझ ४२). सामनावीर : नवाझ

Exit mobile version