पाकिस्तानमध्ये आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय असलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी शेहबाज शरीफ सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत. इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी पीटीआय (पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ) कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. देशभरातील पीटीआयचे कार्यकर्ते इस्लामाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. पाकिस्तानातील आघाडी सरकारसाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. अनेक ठिकाणांहून हिंसाचाराच्या बातम्याही येत आहेत.
इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना सरकारच्या विरोधात ‘करा किंवा मरा’ (करो या मरो) आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानंतर सर्व पीटीआय समर्थक राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल होत आहेत. पीटीआय समर्थकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराने राजधानी इस्लामाबादमधील अनेक भागात रेड झोन तयार केले आहेत. रेड झोनमध्ये सरकारी कार्यालये, पंतप्रधानांचे निवासस्थान, संसद आणि दूतावासांचा समावेश आहे, याठिकाणी लष्कर तैनात करण्यात आले आहे. तसेच रेड झोनच्या आसपास आंदोलक दिसताच त्याला गोळ्या घालण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलन करणाऱ्यांची संख्या ३०००० पेक्षा जास्त आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून इम्रान खान रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत. माहितीनुसार, त्यांच्यावर २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही प्रकरणांमध्ये इम्रान खान यांना जामीन मिळाला आहे, तर काही प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.
हे ही वाचा :
राज्यघटना लोकशाहीचा पाया असून संविधान देशासाठी सर्वात पवित्र ग्रंथ