जम्मू- काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव असतानाचं दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरघोडी अजूनही थांबलेल्या नाहीत. या तणावादरम्यानचं, पाकिस्तानच्या बाजूने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानने रात्रभर नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. भारतानेही पाकिस्तानच्या या कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार झाला, परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने गोळीबार केला. “पाकिस्तानी सैन्याने सीमेवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला. आमच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिले. अधिक माहिती मिळवली जात आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचा शिमला करार आणि इतर द्विपक्षीय करार स्थगित केले, सर्व व्यापारावर बंदी घातली आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले. यासोबतच, सिंधू पाणी कराराअंतर्गत वाटप केलेल्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचा किंवा बदलण्याचा कोणताही प्रयत्न युद्ध छेडण्यासारखा मानला जाईल, असे त्यात म्हटले आहे. तर, मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने बुधवारी १९६० चा सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी करण्याची घोषणा केली. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबाची आघाडी संघटना असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हे ही वाचा:
पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला मध्य रेल्वेत नोकरी
“भोंगा मुक्त मुलुंड”, मशिदींवरील अनधिकृत भोंगे पोलिसांनी उतरवले!
पाकिस्तानचा शेअर बाजार अडीच हजारांनी पडला!
सिंधू जल कराराचे स्थगन योग्य दिशेने उचललेले पाऊल
दरम्यान, गुरुवारी उधमपूर जिल्ह्यात संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत विशेष दलाचा एक जवान हुतात्मा झाला. पहलगाम हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या पाच ते सहा दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली. त्यांनी हल्ल्यामागे असल्याचा संशय असलेल्या आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा या तीन संशयितांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत आणि हल्लेखोरांना विश्वासार्ह माहिती देणाऱ्या कोणालाही २० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.