हल्ली हातात पुस्तक कमी मोबाईल जास्त असे वातावरण आहे. वाचन संस्कृती कुठे तरी कमी होत असल्याचे बोलले जात आहे. पण ही वाचन संस्कृती वाढवण्याचा मात्र नवकल्पना पुढे येतांना दिसत नाही. पण हातात पुस्तक पडलं की आपोआप वाचनाची गोडी लागते. याचा अनुभव रविवारी डोंबिवलीत आला. एरवी विक्रेते, वाहने आणि माणसांनी ओथंबून वाहणारा फडके रोड पुस्तकांनी फुलून गेला. पहाटे पाच वाजता फडके रोडवर एक नाही दोन नाही तर चक्क लाखभर पुस्तकांच्या पखरणीने बहरला. या पुस्तकाच्या सुंगंधाने अवघ्या सहा तासात सहा हजारपेक्षा जास्त पुस्तकप्रेमी आकर्षित झाले. वाचकप्रेमींनी केवळ सुगंधच घेतला नाही तर आपल्याला आवडलेले फुल (पुस्तक) परडीत टाकून घेऊन गेले. तेही कोणतेही मूल्य न देता आता बोला…
एकीकडे वाचनालये बंद पडत असतांना डोंबिवलीतील पै फ्रेन्ड्स लायब्ररी गेल्या अनेक वर्षांपासून वाचनालय संस्कृती जपून आहे. पण त्या सोबतच नवनवीन संकल्पना आणून वाचन संस्कृती देखील जपत आहे. बुक स्ट्रीट हा असाच एक त्यातील अनोखा उपक्रम. जुन्या, नवीन पुस्तकांचा प्रचार, प्रसार व्हावा या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लागावी आणि त्याच्या सोबतच बाजारात येणारी वैविध्यपूर्ण पुस्तके वाचकांना कळावित हा या बुक स्ट्रीट आयोजनामागचा उद्देश. डोंबिवलीकरांची पहाटच झाली ती या पुस्तकांच्या साक्षीने. सकाळी पाच वाजताच शेल्फमधली पुस्तके फडके रस्त्यावरील माॅडर्न कॅफे हाॅटेल ते अप्पा दातार चौक अशा ३०० मीटर अंथरलेल्या लाल गालिच्यावर येऊन विसावली. ३०० मीटर परिसरात जिथे नजर टाकावी तिकडे फक्त पुस्तके दिसत होती.
बहुभाषिक, कथा, कांदबऱ्या, ऐतिहासिक, विज्ञान, अनुवादित, लहान मुलांसाठीची पुस्तके अशी इंग्रजी, मराठी अशा विविध पुस्तकांची पखरण केली होती.जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यामुळे वाचकप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहाटेपासूनच बदलापूर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वाचकप्रेमींनी ही पुस्तकांची अनोखी नदी बघण्यासाठी गर्दी केली होती.
हे ही वाचा:
आता ‘वॉटर मेट्रो’ने घ्या केरळच्या बॅक वॉटरचा आनंद
सत्यपाल मलिक यांच्या अटकेचे वृत्त चुकीचे
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू
परदेशात आशा प्रकारच्या बुकस्ट्रीट आहेत. देशोदेशीचे वाचकप्रेमी बुक स्ट्रीटवर येत असतात. एक दिवस रस्त्यावर गोंगाट नाही, बाजार नाही. तो दिवस फक्त पुस्तकांसाठी या विचारातून विदेशात एक दिवस रस्त्यावर पुस्तकेच पुस्तके मांडली जातात. पुस्तके बघण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी वाचन प्रेमी झुंबड करतात, तोच विचार करून डोंबिवलीत हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता. पुस्तक प्रेमींनी यावे पुस्तक बघावे आणि आवडलेले पुस्तक कोणतेही मूल्य न देता मोफत घेऊन जावे असा उद्देश या मागे होता. सकाळी ५ ते १० या वेळेत जवळपास ६,९०० पुस्तक प्रेमी भेट देऊन गेले असे , असे संयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.