जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अचानक पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. पाच दहशतवाद्यांनी AK-४७ रायफल्सने गोळीबार केला. मृतांमध्ये सहा महाराष्ट्रातील आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. याच दरम्यान, या घटनेतील हल्लेखोरांची माहिती समोर आली आहे. दोन दहशतवादी हे पाकिस्तानचे आणि दोन दहशतवादी हे स्थानिक असल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, शोध पथकातील सूत्रांनी ही माहिती दिली.
एका वरिष्ठ सूत्रानुसार, पहलगाम हल्ल्यादरम्यान तीन ते चार दहशतवाद्यांनी AK-४७ रायफल्सने सतत गोळीबार केला. यातील दोन दहशतवादी ‘पश्तो’ भाषेत बोलत होते, जी पाकिस्तानी नागरिक असल्याचे दर्शविते. तर इतर दोघे दहशतवादी हे बिजभेरा आणि त्राल येथील स्थानिक आहेत. आदिल आणि आसिफ अशी यांची नावे आहेत.
हल्लेखोरांपैकी एक किंवा दोन जणांनी बॉडी कॅमेरे घातले होते आणि त्यांनी संपूर्ण घटना रेकॉर्ड केली होती. एनआयएने सर्वांचे जबाब नोंदवले आहेत आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून गोळ्यांचे कवच आणि इतर नमुने गोळा करत आहे.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींचा कानपूर दौरा रद्द
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लग्नाच्या वाढदिवशीचं रायपूरमधील व्यावसायिकाने गमावला जीव
… आणि ती सहल अखेरची ठरली; डोंबिवलीतील हेमंत जोशींचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्र प्रसिद्ध!
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे. सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु आहे. सुरक्षेच्या मुद्यावर दिल्लीतील संरक्षण मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तीनही दलाचे प्रमुख बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पहलगाममध्ये दाखल झाले. त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. हल्ल्यातून बचावलेल्या लोकांची त्यांनी भेट घेतली आणि ‘भारत दहशतवादासमोर झुकणार नाही,’ असे ते म्हणाले.