भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विरोधकांकडून नेहमी चिखलफेक होत असते. त्यातून काही लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यात येतात किंवा तसे समज निर्माण होतात. पण पद्म पुरस्काराच्या निमित्ताने एका विजेत्याने हा गैरसमज दूर होऊन नरेंद्र मोदी यांनीच आपल्याला न्याय दिला अशी भावना व्यक्त केली आणि त्याची चर्चा देशभरात सुरू झाली.
रशीद अहमद कादरी यांनी पद्म पुरस्कारासाठी गेली १० वर्षे सातत्याने प्रयत्न केले. कर्नाटकातील ते एक कलाकार. त्यांनी पद्म पुरस्कार मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. पण २०१४मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आणि त्यानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले असे त्यांनीच सांगितले.
कर्नाटकातील ज्या आठजणांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले त्यात कादरी यांचा समावेश आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या पुरस्काराचा हा संघर्ष कथन केला आहे. कादरी म्हणतात की, पद्म पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी सुखद आश्चर्य होते. भाजपाचे सरकार जेव्हा आले तेव्हा आता तर मला हा पुरस्कार मिळणारच नाही. कारण हे सरकार मुस्लिमांसाठी काही करतच नाही, अशी माझी भावना होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला चुकीचे ठरविले. त्यांनी पद्म पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार केला.
कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्यासमोरही याच भावना व्यक्त केल्या. त्याचा व्हीडिओ आता देशभरात चांगलाच व्हायरल होत असून कादरी यांचे कौतुक होत आहे. पंतप्रधानांनी पद्म विजेत्यांचे कौतुक केले तेव्हा नरेंद्र मोदी यांचा हात हातात घेऊन कादरी यांनी आपल्या मनातील संभ्रम आज दूर झाला आणि मोदी यांनी आपल्या मनातील गैरसमज दूर केला ही भावना व्यक्त केली.
हे ही वाचा:
तामिळनाडूत युवकाने सापाचाच घेतला चावा; झाली अटक
कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर
ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी आता १४ एप्रिलला
सावधान.. देशात २४ तासांत कोरोनाचे ५००० पेक्षा जास्त रुग्ण
कादरी पंतप्रधानांना म्हणाले की, मी यूपीएचे सरकार असताना पद्म पुरस्कार मिळेल याची प्रतीक्षा करत होतो. पण मला पुरस्कार मिळाला नाही. नंतर तुमचे सरकार आले तेव्हा मनाशी खूणगाठ बांधली की, आता काय आपल्याला पुरस्कार मिळणार नाही. भाजपा सरकार आपला विचार करणार नाही. पण तुम्ही मला चुकीचे ठरवलेत. तुमचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
कादरी यांनी या भावना व्यक्त केल्यावर मोदी यांनी हसून त्यांना दाद दिली.
कादरी हे कर्नाटकातील एक कलाकार आहेत. धातूच्या वस्तूंवर कलाकारी करण्याचा त्यांचा पेशा आहे. १४व्या शतकात ही कला विकसित झाली होती. बहामनींच्या सत्ताकाळात या कलेला मानसन्मान मिळाला होता. ६८ वर्षीय कादरी यांची ही तिसरी पिढी. बहामनी राजसत्तेच्या काळात फूलझाडी डिझाइन लोकप्रिय होते. कादरी यांना याआधी राज्य पुरस्काराने तसेच राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. ग्रेट इंडियन अचिव्हर्स पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.