जवळपास १५ दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. आझाद मैदानातील आंदोलन मागे घेत असल्याचे ते म्हणाले. आता यापुढील आंदोलन एसटी कर्मचारी करतील असे त्यांनी म्हटले आहे.
आझाद मैदानातील आंदोलनातून माघार घेण्यात आली असली तरी महाराष्ट्राच्या इतर भागात आंदोलन करायचे की नाही हे एसटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असेल. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, एसटीची बिकट झालेली आर्थिक अवस्था आणि महत्त्वाचे म्हणजे एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण या मुद्द्यांवर हे आंदोलन गेले १५ दिवस सुरू होते.
यासंदर्भात सदाभाऊ खोत म्हणाले की, हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केले होते. कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळणे आवश्यक होते, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे अशीही मागणी होती. सरकारने मात्र या कर्मचाऱ्यांना नेहमीच वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाची मागणीही केली होती. पण या आंदोलनामुळे एक टप्पा तरी यशस्वी झाला असून त्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. १७ हजार पगार मिळणाऱ्या कामगारांना आता २४ हजारांच्या आसपास पगार मिळणार आहे. ज्यांना २३ हजार पगार मिळत होता तो २८ हजार होणार आहे. आम्ही या आंदोलनातून माघार घेतली असली तरी आमच्या यापुढे सुरू राहणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा राहीलच.
हे ही वाचा:
गलवानचा शूर कर्नल संतोष बाबू ठरला ‘महावीर’
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ
प्रॉव्हिडंट फंड साठी केला संघर्ष, पण मृत्युनंतरच खात्यात जमा झाली रक्कम!
सरकारने दोन पावले पुढे टाकली होती. कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आंदोलन केले गेले तर आम्ही पाठीशी राहू.