चेन्नई येथील महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर गुरुवारी होणार्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सामना चीनविरुद्ध होईल. मात्र हा सामना १४ वर्षीय बॉल-बॉय पी. प्रसन्ना याच्यासाठी खेळापेक्षाही अधिक वेगळा असेल. जून २०२०मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षादरम्यान प्रसन्ना याचे वडील हवालदार के. पलानी हे शहीद झाले होते. आता त्याच चीनविरुद्धच्या सामन्यात प्रसन्ना बॉलबॉय म्हणून भूमिका बजावेल.
प्रसन्ना हा रामनाथपुरममधील डीडी विनयगर माध्यमिक शाळेत इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. या सामन्यासाठी बॉल-बॉईज म्हणून निवडण्यात आलेल्या २० मुलांमध्ये प्रसन्नाचीही निवड झाली आहे. सहा संघांचा सहभाग असलेली आशियाई चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा गुरुवारपासून येथे रंगणार आहे.
बॉलबॉयचे कर्तव्य बजावत असताना चीनच्या संघाबद्दल त्याच्या काय भावना आहेत?, असे त्याला विचारले असता प्रसन्नाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. ‘सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या आठ बॉल बॉइजमध्ये माझी निवड झाली आहे का, याबाबत मला माहीत नाही,’ असे प्रसन्नाने सांगितले तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. प्रसन्न काही वर्षांपूर्वीच हॉकी खेळू लागला आहे. आता त्याला त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हॉकी या खेळात नाव कमवायचे आहे. ‘माझ्या वडिलांनी हॉकीमध्ये मोठे यश मिळवून जे चांगले नाव कमावले ते जतन करणे, हे माझे अंतिम ध्येय आहे,’ असे प्रसन्न सांगतो.
हे ही वाचा:
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९४ लाख अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे
पुणे दहशतवादी प्रकरणात पाचव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
वज्रमुठ सुटली, रिमोट बंद पडला,विरोधी आघाडीचा बाजार उठला…
प्रसन्नाचे वडील पलानी यांना जानेवारी २०२१मध्ये मरणोत्तर वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. ‘मला एक दिवस हॉकीमध्ये मोठे काही करून दाखवण्याची इच्छा आहे. मी खेळातील बारकावे जाणून घेईन. खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी अनेकांना मिळणार नाही. बॉल बॉय म्हणून मी हे करू शकतो. मला मिळालेल्या संधीचा मला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे,’ असे प्रसन्ना सांगतो.
‘वडील गमावल्यानंतर झालेल्या प्रचंड वेदनांवर मात करण्यास हॉकी खेळल्याने मदत झाली. माझ्या मित्रांना खेळताना पाहिल्यानंतर मलाही हॉकीमध्ये खेळण्यात रस वाटू लागला. माझ्या हॉकीच्या प्रवासात माझ्या वडिलांनी मला साथ दिली. जेव्हा ते घरी येत तेव्हा मला शेतात नेत आणि माझ्याकडून हॉकीचे धडे गिरवत. आता हॉकी खेळणे माझ्यासाठी एखाद्या मलमासारखे आहे. काही काळासाठी का होईना, वडील गमावल्याचे दुःख मी विसरतो. जेव्हा मी खेळतो तेव्हा माझी मानसिकता वेगळी असते, त्यामुळे मला मानसिक बळ मिळण्यास मदत होते,’ असे प्रसन्ना सांगतो.