भारताच्या काही राज्यांच्या किनारी भागात ‘दाना’ चक्रीवादळाचे संकट घोंगावत असून या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. ‘दाना’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून एनडीआरएफने ओडिशात त्यांच्या ५६ टीम्स तैनात केल्या आहेत. हे चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. याचं पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने किनारी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम हाती घेतली आहे.
‘दाना’ वादळाचा परिणाम पुरीपासून पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपर्यंत दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, पूर्व- मध्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेले खोल दाब पश्चिम- वायव्य दिशेने ताशी १८ किलोमीटर वेगाने सरकले आणि चक्री वादळात रुपांतर झाले. त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांवर या वादळाचा परिणाम दिसून येईल. या दरम्यान वारे ताशी १२० किमी वेगाने वाहू शकतात. चक्रीवादळाच्या आगमनाने दक्षिण बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ पोहोचण्याची प्रक्रिया 24 ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरू होईल आणि २५ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत सुरू राहील. हवामान खात्यानुसार, चक्रीवादळ किनारपट्टीवर पोहोचल्यावर दोन मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. हे चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकणार आहे.
हे ही वाचा :
जम्मू- काश्मीरमध्ये १९ वर्षीय स्थलांतरित मजुरावर दहशतवादी हल्ला
पुण्यात पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू
सलमानसाठी धमकीचा संदेश पाठवणाऱ्या हुसैन शेखला ठोकल्या बेड्या
मविआचा ८५ चा फॉर्म्युला ठरला, उर्वरित जागांवर मित्र पक्षांसोबत चर्चा!
‘दाना’ चक्रीवादळामुळे दक्षिण पूर्व रेल्वे (SER) कार्यक्षेत्रातून धावणाऱ्या १७० हून अधिक एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढे परिस्थितीची पाहणी करून गरज भासल्यास या भागातून धावणाऱ्या आणखी गाड्या रद्द केल्या जाऊ शकतात, अशी माहिती रेल्वेने दिली आहे. तर, ‘दाना’ चक्रीवादळाच्या आधी खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण वाहतूक गुरूवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १५ तासांसाठी स्थगित केली जाणार आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत उड्डाणे थांबवण्यात येतील.