पाकिस्तानात पोलिसांचे बंड; म्हणाले चॅम्पियन्स ट्रॉफीत काम करणार नाही!

१०० पोलिसांवर बडतर्फाची कारवाई

पाकिस्तानात पोलिसांचे बंड; म्हणाले चॅम्पियन्स ट्रॉफीत काम करणार नाही!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान सुरक्षा कर्तव्ये पार पाडण्यास नकार दिल्याबद्दल पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांच्या १०० हून अधिक पोलिसांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. बडतर्फ केलेले कर्मचारी पोलिस दलाच्या विविध शाखांशी संबंधित होते.

पंजाब पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान हे पोलीस अनेक वेळा ड्युटीवर गैरहजर राहिल्याचे आढळून आले होते, तर अनेकांनी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान त्यांना देण्यात आलेली कामे करण्यास नकार दिला होता. त्यानंतर अशा १०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि नियुक्त हॉटेल्स दरम्यान प्रवास करणाऱ्या संघांना सुरक्षा पुरवण्यासाठी हे पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते. पण ते एकतर अनुपस्थित राहिले किंवा त्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले, पंजाबचे आयजीपी उस्मान अन्वर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा निष्काळजीपणाला जागा नाही आणि कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाऊ शकत नाही.

हे ही वाचा : 

भारत- पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला केले ठार

द्वारकामधील भिडभंजन भवनेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग गेले चोरीला

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वकील उज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

मंदिरांची धार्मिक परंपरा मोडणाऱ्या मुस्लिम व्यापाऱ्यांवर यात्रांमध्ये बंदी घालणे योग्यचं!

पोलिसांनी त्यांचे कर्तव्य बजावण्यास नकार का दिला याबद्दल सध्या कोणतेही अधिकृत विधान नाही. त्याच वेळी अनेक स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार असे मानले जाते कि कामावरून काढण्यात आलेल्या पोलिसांवर कामामुळे अधिक ताण येत होता, त्यामुळेच त्यांनी आपले कर्तव्य बजावण्यास नकार दिला.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. माहितीनुसार, १३ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. एका खेळाडूच्या सुरक्षेसाठी १०० पोलिस तैनात असतात. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू झाली. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होत आहेत.
टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळत आहे. पाकिस्तानसह उर्वरित सातही संघांच्या सुरक्षेसाठी हजारो पोलिस तैनात आहेत. पाकिस्तानातील कराची, रावळपिंडी आणि लाहोर या तीन शहरांमध्ये सामने होत आहेत. दरम्यान, न्यूझीलंड आणि भारताकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आधीच बाहेर पडला आहे.
Exit mobile version