मंगळवारी सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत शिवसेनेच्या अर्थात एकनाथ शिंदेंच्या आलेल्या जाहिरातीमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता दिसली. या जाहिरातीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो होता तसेच काही आकडेवारीही प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेकडून ३० टक्के कौल आहे तर शिवसेनेला १६ टक्के कौल असेल असा दावा करण्यात आला तसेच मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना २६ टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना २३ टक्के पसंती देण्यात आली. यावरून विरोधकांना खुमखुमी आली आणि यानिमित्ताने तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात कसा बेबनाव होईल, मतभेद निर्माण होतील यासाठी प्रयत्न सुरू झाले. मग फडणवीस यांच्याबद्दल कुणी सहानुभूती व्यक्त केली तर एकनाथ शिंदे कशी फडणवीसांकडून खुर्ची काढून घेणार अशीही टीका झाली. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो या जाहिरातीत का नाही, या मुद्द्यावरूनही विरोधकांनी खुसपट काढले.
खरे तर, ही जाहिरात सरकारच्या कामांची जाहिरात नाही. ती शिवसेना या पक्षाची जाहिरात आहे. त्यामुळे त्यात एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती आहे, असे म्हटले तर त्यात वाईट वाटण्याचे विरोधकांना कारण नाही. मजेची गोष्ट म्हणजे आज जे विरोधक फडणवीसांबद्दल दुःख व्यक्त करत आहेत, त्यांना फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावेत असेही वाटत नव्हते. त्यामुळेच जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा फडणवीसांना कसे सत्तेपासून दूर ठेवले असे म्हणत डिवचण्याचा प्रयत्न हे विरोधक करत होते पण आता त्यांनाच फडणवीसांबद्दल सहानुभूती वाटते आहे. अर्थात ती खोटी आहे. त्यांना या जाहिरातीच्या निमित्ताने कसा या दोन नेत्यांमध्ये बेबनाव निर्माण होईल, याचीच प्रतीक्षा आहे. कारण जेव्हापासून हे सरकार अस्तित्वात आले आहे तेव्हापासून हे सरकार कसे पडेल यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या तारखाही विरोधक देत आहेत. संजय राऊत यांनी फेब्रुवारीत सरकार पडेल असे म्हटले होते पण आता जून उजाडला तरी सरकार भक्कम आहे. त्यामुळे या जाहिरातीच्या निमित्ताने सरकार पाडण्यासाठी काही कांडी करता येईल का, असा विरोधकांचा प्रयत्न आहे, यापेक्षा वेगळे काही म्हणता येणार नाही.
हे ही वाचा:
ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले
‘उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांनंतर आता कागदपत्रे गायब’
सलग तीन महिने किरकोळ महागाई दर नीचांकी
‘जाहिरातीमध्ये न पडता डबल इंजिन सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक’
मुळात एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत ते भारतीय जनता पक्षामुळेच. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपानेच पसंती दर्शविलेली आहे. मग मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांच्याच नावाला पसंती दिली तर विरोधकांना पोटदुखी होण्याचे कारण नव्हते. भाजपानेही अगदी फडणवीस यांनीही यासंदर्भात उलट प्रतिक्रिया दिलेली नाही. बावनकुळे तर म्हणाले की, पहिला किंवा दुसरा असे मानण्याचे काही कारण नाही. जाहिरातीत अडकण्याची गरज नाही.
दुसरा मुद्दा संजय राऊत यांनी उपस्थित केला तो म्हणजे या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही? त्यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे, त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षांची युती आहे, असे म्हणताना मग त्यांचा फोटो जाहिरातीत का वापरला नाही असा प्रश्नही राऊत यांनी विचारला. पण हा प्रश्न विचारण्याचा त्यांना आता अधिकार नाही. कारण मुळात जेव्हापासून एकनाथ शिंदे आमदारांसह बाहेर पडले तेव्हापासून आता बाळासाहेबांचा फोटो वापरू नका, आमचा बाप चोरू नका, स्वतःच्या बापाचे फोटो लावा आणि निवडणुकीत मते मागा, नाहीतर नरेंद्र मोदींचे फोटो लावा अशी टीका रोजच्या रोज विविध सभांमध्ये संजय राऊत यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनीही केलेली आहे. मग आता बाळासाहेबांचा फोटो न लावता मोदींचा फोटो जाहिरातीत लावला तर उद्धव ठाकरे गटाला राग येण्याचे काही कारण नाही. उलट एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे, त्यामुळे आमची युती भक्कम आहे. त्यांचे विचार आमच्या मनात आहेत.
एकूणच ही जाहिरात विरोधकांना चांगलीच झोंबली. गेल्या जवळपास वर्षभरात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र काम करताना सातत्याने अनेक निर्णय घेत आहेत, अनेक योजना कार्यान्वित केलेल्या आहेत, शासन आपल्या दारीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत आपल्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे कुठेतरी या सरकारला कसे अडचणीत आणता येईल यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या जाहिरातीचा आधार विरोधी पक्षांनी घेतला. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेबांचा फोटो का नाही, असा सवाल उपस्थित केला ते अधिक हास्यास्पद होते. कारण एकनाथ शिंदेंनी आपल्या जाहिरातीत कुणाचे फोटो वापरावे हा त्यांचा प्रश्न होता. सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी झुकते माप का दिले, अजित पवारांकडे का जबाबदारी सोपविण्यात आली नाही, हा जसा त्यांच्या पक्षाचा प्रश्न होता असे म्हटले जात होते, तसाच हा शिंदे यांचा प्रश्न होता. पण एकूणच विरोधकांचे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नात हा एक आणखी नवा प्रयोग त्यांनी करून पाहिला आहे, बाकी त्याला आणखी काही म्हणता येणार नाही.