दिल्ली विधानसभा निवडणुका लवकरच पार पडणार असून येत्या २-३ दिवसात निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानावर करण्यात आलेला खर्च समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला भाजपा ‘काचेचा महाल’ म्हणून संबोधते. पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात काचेच्या महालाचा उल्लेख करत केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. अशातच कॅगचा अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक गोष्टींचा खुलास झाला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी ३३ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला, जो प्रारंभिक अंदाजे खर्च ७.९१ कोटी रुपये इतका होता. अरविंद केजरीवाल यांच्या नावावर २०२० मध्ये बंगल्याचे नूतनीकरण सुरु झाले. बंगल्यात बसवण्यात आलेल्या वस्तूंचाही उल्लेख कॅगच्या अहवालात करण्यात आला आहे.
अहवालात म्हटले आहे की, २८.९ लाख रुपयांना खरेदी केलेला ८८-इंचाचा OLED टीव्ही (८K LG) १० इतर OLED टीव्ही (4K Sony) ज्याची किंमत ४३.९ लाख रुपये इतकी आहे. १.८ लाख रुपये खर्चून मायक्रोवेव्ह ओव्हन बसवण्यात आले. दोन स्टीम ओव्हनची किंमत ६.५ लाख रुपये इतकी आहे. वॉशिंग मशीनची किंमत १.९ लाख रुपये. १० बेड आणि सोफ्यावर १३ लाख रुपये खर्च करण्यात आले. १९.८ कोटी रुपये खर्चून ७ नोकरगृहे बांधण्यात आली आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार, कॅगने असेही नमूद केले आहे की पीडब्ल्यू विभागाने ऑडीटसाठी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत. कॅगचा अहवाल एलजीकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, केजरीवाल यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये दारू घोटाळ्यात जामिनावर तुरुंगातून सुटल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये नूतनीकरण केलेले निवासस्थान रिकामे केले. सध्या हा बंगला दिल्लीच्या मुख्यमंत्री आतीशी यांच्या नावावर आहे.
हे ही वाचा :
पन्नूला आली धमकी देण्याची पुन्हा खुमखुमी, महाकुंभला दिला इशारा
एमके स्टॅलिन यांनी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला
फिरोजाबादमधील मुस्लिमबहुल भागात सापडले ‘शिव मंदिर’, ३० वर्षांपासून होते बंद!