हुश्श!! पाच वर्षे झाली, आता लोअर परळ पुलाची एक मार्गिका खुली

जुलै २०१८पासून हा पूल बंद असल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांचे खूप हाल होत होते

हुश्श!! पाच वर्षे झाली, आता लोअर परळ पुलाची एक मार्गिका खुली

ब्रिटिशकाळात बांधलेल्या लोअर परळच्या (डिलाइल रोड) पुलाची ना. म. जोशी मार्गाला जोडणारी एक मार्गिका अखेर खुली करण्यात आली आहे. रेल्वेरुळांवरून जाणारा हा संपूर्ण पूल जुलैअखेरीस संपूर्ण कार्यान्वित होईल, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तब्बल ५ वर्षांनी या पुलाची एक मार्गिका खुली होत आहे. मात्र खुल्या करण्यात आलेल्या मार्गिकेवर पथदिवे नसल्याची टीका स्थानिक रहिवाशांनी केली आहे. स्थानिकांनी मागणी केल्यानुसार, येथे एलिव्हेटरही बसवण्याचे नियोजन आहे. मात्र ते दिवाळीनंतरच बसवले जातील. म्हणजे पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी दिलेल्या अंतिम मुदतीच्या तीन महिन्यांनंतरच हे काम होऊ शकणार आहे.

या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे २२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यापैकी १३८ कोटी मुंबई महापालिकेने खर्च केले असून ८७ कोटींचा खर्च पश्चिम रेल्वेने उचलला आहे. रेल्वेरुळांवरून जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाचा खर्च पश्चिम रेल्वेने केला आहे.

जुलै २०१८पासून हा पूल बंद असल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांचे खूप हाल होत होते. लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड, भायखळा परिसरात वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा आहे. सध्या लोअर परळ पश्चिमेला सेनापती बापट मार्ग जंक्शन येथून येणाऱ्या गणपतराव कदम मार्गावर उर्मी इस्टेट आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क येथून रेल्वे स्पॅनपर्यंतची मार्गिका वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार, १ जूनपासून खुली करण्यात आली.

 

हे ही वाचा:

सरकारी अधिकारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत

मुख्यमंत्र्यांकडून किल्ल्यांच्या संवर्धनाला प्राधान्य, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना

‘मद्यधोरण चांगले होते तर मागे का घेतले?’

रायगडचा इतिहास सांगणाऱ्या गाईडना पाच लाखांचा विमा

आता महापालिकेने करीरोड स्थानकाकडे जाणारी मार्गिका खुली करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोअर परळ मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपिचंद देसाई यांनी याबाबत मुंबईच्या पालकमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले. ‘पुलाची करीरोडच्या दिशेकडील बाजू ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण या पुलामुळे लालबाग आणि केईएम रुग्णालयात जाणे सोपे पडते. आता लोअर परळहून लालबागला जायला अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागतो,’ असे देसाई म्हणाले.

 

अंधेरीतील गोखले पूल कोसळल्यानंतर आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणात लोअर परळचा पूल धोकादायक घोषित केला होता. त्यामुळे २४ जुलै २०१८पासून तो रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. जून २०१९मध्ये हा पूल पूर्णपणे तोडण्यात आला.

Exit mobile version