एक्सप्रेस थांबली नाही, तरूणांनी टाकल्या उड्या एकाचा मृत्यू

एक्सप्रेस मेल रेल्वे स्थानकात थांबत नाही बघून तिघांनी धावत्या एक्सप्रेसमधून टाकल्या उड्या

एक्सप्रेस थांबली नाही, तरूणांनी टाकल्या उड्या एकाचा मृत्यू

एक्सप्रेस मेल रेल्वे स्थानकात थांबत नाही हे बघून तिघांनी धावत्या एक्सप्रेसमधून फलाटावर उड्या टाकल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकावर घडली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फरीद अन्सारी (२२) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव असून रियाज (१९) आणि आणखी एक ४० वर्षीय अनोळखी प्रवासी हे दोघे जखमी झाले आहेत. जखमी रियाज हा मृत फरीद याचा नातेवाईक असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली. फरीद आणि रियाज हे दोघे मूळचे उत्तरप्रदेश काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. पुण्याहून त्यांना कर्जतला यायचे होते. शुक्रवारी पहाटे त्यांनी पुण्याहून डेक्कन क्वीन ही एक्सप्रेस पकडली.

डेक्कन क्वीन एक्सप्रेसला कर्जतला थांबा नसल्यामुळे त्यांनी कल्याणला उतरण्याचा निर्णय घेतला. कल्याण स्थानक जवळ येताच हे दोघे आणि ४० वर्षीय सह प्रवासी दरवाजा जवळ येऊन थांबले. कल्याण रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस थांबत नसल्याचे बघून तिघांनी धावत्या एक्सप्रेस मधून एका पाठोपाठ फलाटावर सामानसह उड्या टाकल्या.

हे ही वाचा:

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

त्यात फरीद हा फलाटावरून एक्स्प्रेस आणि फलाटाच्या फटीतून रुळावर पडला तर रियाज आणि सह प्रवाश्याला फलाटावर असलेल्या लोहमार्ग पोलिस आणि प्रवाशांनी वाचवले. घटनास्थळी दाखल असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ तिघांना उपचारासाठी कल्याणच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात आणले, डॉक्टरांनी फरीद याला तपासून मृत घोषित केले. तर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

Exit mobile version