एकाही नव्या कोविड रुग्णाची नोंद नाही
महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे कोविडच्या विळख्यातून बाहेर येत आहेत. भंडारा जिल्हा तर संपूर्णपणे कोरोनामुक्त देखील झाला आहे. त्यापाठोपाठ आता आणखी एक जिल्हा देखील कोविडच्या कचाट्यातून बाहेर पडताना दिसत आहे. तब्बल दीड वर्षानंतर एकाही कोविड रुग्णाची नोंद या जिल्ह्यात झालेली नाही.
भंडारा जिल्ह्यापाठोपाठ नागपूर जिल्हा देखील कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. दीड वर्षाच्या कालावधीनंतर या शहरात एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या १८३ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे. तर गेल्या चोवीस तासात एकही नवा रुग्ण समोर आला नाही. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होण्यामध्ये आणखी एका जिल्ह्याला यश मिळालं आहे.
खरंतर, नागपुरात ११ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर काही दिवस एकही रुग्ण आढळला नाही. मात्र नंतर करोनाने शहर आणि ग्रामीणमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र होतं. मात्र आता दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील बाधितांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
हे ही वाचा:
…आणि धाडसी पत्रकारितेचा डांगोरा पिटणाऱ्या एनडीटीव्हीची उडाली भंबेरी
सुनील गावसकरांनी हटके अंदाजात साजरा केला नीरजचा विजय
कुर्ल्यात अडकले रेल्वे ट्रॅक…वाचा
शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात बरे होणाऱ्या करोना रुग्णांची टक्केवारी ९७.९१ टक्के इतकी होती. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १८३ आहे.
जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या करोनाच्या अहवालात शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य दाखविण्यात आली होती. शनिवारी कळमन्यातील एका व्यक्तीने दोनदा करोनाच्या तपासण्या केल्या, यातील पहिला अहवाल निगेटिव्ह आणि दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान, करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज जिल्हाधिकारी आर. विमला आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केली.