१७ मार्च रोजी नागपूर परिसरात झालेल्या दंगलीनंतर सरकारने पंचनामा आणि भरपाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पंचनामा अहवालानुसार, दंगलीत एकूण ६२ वाहनांचे नुकसान झाले, ज्यात ३६ कार, २२ दुचाकी, २ क्रेन आणि २ तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय एका घराचेही नुकसान झाले. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूरचे प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचनामा सुरू करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर नागपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया राबविली.
नागपूर जिल्हा प्रशासनानेही भरपाई वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे आणि ज्यांची वाहने पूर्णपणे खराब झाली आहेत त्यांना रुपये ५०,००० भरपाई मिळेल. याशिवाय, ज्या वाहनांचे कमी नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी रुपये १०,००० भरपाई निश्चित करण्यात आली आहे. ज्यांनी आधीच विम्याचा लाभ घेतला आहे त्यांना भरपाई दिली जाणार नाही. दंगलीत ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते त्यांचा पंचनामा तयार करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी घरोघरी जाऊन नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत आणि सर्वांचा हिशोब तयार करत आहेत.
हे ही वाचा :
बंगल्यात रोकड सापडलेल्या दिल्लीतील न्यायाधीशांचे साखर कारखाना बँक घोटाळ्यात नाव
ट्रम्प यांचा चार देशांमधील स्थलांतरितांना दणका; ५ लाख स्थलांतरित होणार हद्दपार
सोमवारी पत्रकार शितोळे यांची शोकसभा
दरम्यान, हिंसाचाराच्या या प्रकरणात आतापर्यंत एकूण १०५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर हिंसाचाराच्या संदर्भात १० किशोरांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचारात ३ डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह ३३ पोलिस जखमी झाले होते. पोलिसांनी मुख्य आरोपी आणि अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टी शहर युनिट प्रमुख फहीम खान आणि इतर पाच जणांविरुद्ध देशद्रोह आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.