हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू येथील कियास गावात सोमवार, १७ जुलै रोजी सकाळी ढगफुटी झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. या ढगफुटीमुळे नऊ वाहने पाण्यात वाहून गेली. हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, दिल्ली या राज्यात पावसाचा जोर प्रचंड असून आतापर्यंत मोठी वित्तहानी आणि जीवितहानी झालेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून यमुना आणि गंगेच्या पुरामुळे जनता त्रस्त झाली आहे. हिमाचल सोबतच उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढून आता धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे. हरिद्वारमध्ये गंगेची पाण्याची पातळी २९३.१५ मीटर नोंदवण्यात आली, तर धोक्याचे चिन्ह २९४ मीटर आहे. नदीलगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देवप्रयाग येथे गंगा नदीची पाणी पातळी २० मीटरने आणि ऋषिकेशला पोहोचेपर्यंत १० सेमी वाढली. वाराणसी आणि प्रयागराजमध्ये घाट बुडू लागले आहेत. काही छोटी मंदिरे आधीच पाण्याखाली गेली आहेत.
दिल्लीत सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यमुनेच्या पाण्याची पातळी २०५.५० मीटरवर पोहोचली. हिमाचल प्रदेशमध्ये पुरामुळे ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना 1 लाख 45 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. हरिद्वारमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. धोक्याची पातळी २९३ च्या जवळ पोहोचली आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये केदारनाथकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील १७ तालुक्यांतील ३८६ गावे पुराच्या विळख्यात असून, त्यामुळे ७८ हजार लोक बाधित झाले आहेत.
हे ही वाचा:
गोरेगाव फिल्मसिटीत बिबट्याने केले कुत्र्याला ठार; कलाकार, कर्मचाऱ्यांत भीती
दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे जम्मू- काश्मीरमधील तीन अधिकारी बडतर्फ
मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन
वंदे भारत एक्स्प्रेसच्या बॅटरी बॉक्सला आग
दरम्यान, हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, चंदीगड, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक येथे मुसळधार आणि बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, सिक्कीम, आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी येथे विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.