२३व्या कबड्डी दिन पुरस्कारांचे वितरण रविवारी करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने ठाणे जिल्हा कबड्डी असो. च्या सहकार्याने कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले होते. ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागी खेळाडूंमधून सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला खेळाडूंची निवड करण्यात आली त्यात अनुक्रमे आकाश शिंदे व हरजित कौर संधू यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरुष खेळाडूला मधु पाटील पुरस्कार तर महिला खेळाडूला अरुणा साटम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पण हे दोन खेळाडू भारतीय संघाच्या सराव शिबिरात असल्याने त्याचा पुरस्कार त्यांच्या पालकांनी स्वीकारला. १० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये आदित्य शिंदे (अहमदनगर), सलोनी गजमल (पुणे) यांना गौरविण्यात आले तर किशोर-किशोरी तसेच कुमार-कुमारी गटात राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीवरून श्रीधर कदम, विजय तारे, संदेश बिल्ले, श्रावणी सावंत, नेहा राठोड, समीक्षा तुरे तर कुमार गटात प्रतीक जाधव, रजत सिंह, वैभव कांबळे, कुमारींमध्ये ज्युली मिस्किटा, मनीषा राठोड, सानिका पाटील यांना गौरविण्यात आले. या खेळाडूंना प्रत्येकी ५ हजारांचे इनाम देण्यात आले.
किशोर गटात राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीवरून सारंग रोकडे, विदिशा सोनार यांना गौरविण्यात आले. त्यांना अडीच हजार रुपये इनाम देण्यात आले. कृतज्ञता पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा ९२ वर्षाच्या पुण्याच्या मालती दाते व्यासपीठावर आल्या त्यावेळी क्रीडारसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले. त्यांच्या बरोबर परभणीच्या मंगल पांडेने देखील हा पुरस्कार स्वीकारला.
हे ही वाचा:
दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे जम्मू- काश्मीरमधील तीन अधिकारी बडतर्फ
गोरेगाव फिल्मसिटीत बिबट्याने केले कुत्र्याला ठार; कलाकार, कर्मचाऱ्यांत भीती
मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन
उद्योग आणि शिक्षणात महाराष्ट्र अग्रेसर
क्रीडापत्रकार सुभाष हरचेकर यांचा गौरव
यावर्षी सुरू करण्यात आलेला दिवंगत फिदा कुरेशी ज्येष्ठ प्रशिक्षक पुरस्कार अनिल घाटे, शरद चव्हाण, सुरेश मापुसकर, राजेंद्र महाजन यांनी, तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार म्हणून सुभाष हरचेकर, राजेंद्र काळोखे, सूरज कदम, इक्बाल जमादार यांनी स्वीकारला. किरण बोसेकर, रघुनंदन भट, लीला पाटील – कोरगावकर, वनिता पाटील – तांडेल, नीलिमा साने(दाते) यांना ज्येष्ठ खेळाडू, तर नयन साडविलकर, पांडुरंग धावडे, मदन चौधरी, बबन होळकर यांना ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून सन्मानित केले गेले. चैताराम पवार, वसंत मांजरेकर, प्रकाश रेडेकर, विश्वास शिंदे, शंकर बूढे, रोहिणी अरगडे, शहाजान शेख यांना ज्येष्ठ पंच म्हणून गौरविण्यात आले. दिवंगत रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता ठरले रतन पाटील, धर्मा सावंत. राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला ठरला तो मुंबई उपनगर जिल्हा. बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन,नांदेड व शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर हे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद मिळविणारे पुरुष व महिला संघ ठरले.
महाराष्ट्रात वर्षभर कबड्डीचा खेळ रसिकांना पहाता यावा म्हणून महाराष्ट्रात बंदिस्त क्रीडा संकुल उभारण्याकरीता प्रयत्न करणार, असे उद्गार खासदार व राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर यांनी यावेळी काढले. ते पुढे असेही म्हणाले की, कॉर्पोरेट कंपन्यांचा सी.आर.एस.फंड हा खेळासाठी वापरण्याकरीता असतो. कबड्डी संघटनांनी हा मिळविण्याकरीता प्रयत्न करावयास हवेत. ७०वी पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रातील अहमदनगर येथे घेण्याकरिता प्रयत्न करू असे राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे म्हणाले.