‘ओएमजी २’चा ‘आदिपुरुष’ होऊ नये म्हणून सेन्सॉर बोर्ड आधीच सज्ज

वाद टाळण्यासाठी आता सेन्सॉर बोर्डाने आधीच तयारी केली आहे

‘ओएमजी २’चा ‘आदिपुरुष’ होऊ नये म्हणून सेन्सॉर बोर्ड आधीच सज्ज

‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवादांवरून झालेल्या वादंगाची पुनरावृत्ती सेन्सॉर बोर्ड आता करू इच्छित नाही. त्यामुळेच अक्षय कुमार अभिनित ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाबाबत बोर्डाची पुनरिक्षण समिती चित्रपटातील संवाद आणि दृश्ये पाहिल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

‘ओह माय गॉड २’ चित्रपटातील संवाद आणि दृश्यांबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची खात्री करण्यासाठी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या पुनरिक्षण समितीकडे पाठवण्यात आला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवादांवर आलेल्या प्रतिक्रियांची पुनरावृत्ती सेन्सॉर बोर्ड करू इच्छित नसल्याने ते टाळण्यासाठी आता सेन्सॉर बोर्डाने आधीच तयारी केली आहे. सेन्सॉर बोर्ड आता देव किंवा धर्म यांसारख्या विषयांशी संबंधित कोणताही चित्रपट पुनरावलोकन आणि पुनरावृत्तीसाठी समितीकडे पाठवेल, असे सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडून भूमिका स्पष्ट करणार

ठाणे गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, एक अटकेत

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत सापाची हजेरी!

रोहित शर्मा, यशस्वीमुळे भारताची सामन्यावर पकड

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात वापरण्यात आलेले संवाद आणि खराब व्हीएफएक्स गुणवत्तेमुळे प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. चित्रपट निर्मात्यांनी काही संवाद बदलल्यानंतर चित्रपटाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनीही या प्रतिक्रियांनंतर सोशल मीडियावर माफीनामा लिहिला.

 

‘ओ माय गॉड २’ मधील कोणती दृश्ये किंवा संवादावर सेन्सॉर बोर्डाला आक्षेपार्ह वाटत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा चित्रपट पुनरिक्षण समितीकडे गेल्यानंतर सेन्सॉर बोर्ड या चित्रपटाबाबत निर्णय घेईल. अमित राय दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार शंकराच्या भूमिकेत आहे. तसेच, या चित्रपटात यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि ‘रामायण’फेम अरुण गोविल हेदेखील दिसणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version