भारतीय हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून इतिहास रचला आहे आणि सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. यानंतर दोन्ही संघांमध्ये पेनल्टी शूटआऊट झाला. भारताने शूटऑफमध्ये ब्रिटनचा ४-२ असा पराभव केला. यासह भारताने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे.
दोन्ही संघाच्या पहिल्या सत्राचा सामना ०-० असा बरोबरीत संपला. मात्र दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला. सर्वप्रथम भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसऱ्या सत्रात गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ब्रिटनच्या संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्येच बरोबरी साधणारा गोल करत स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही.
या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला दुसऱ्या सत्रात मोठा धक्का बसला. अमित रोहिदासला रेड कार्ड देण्यात आल्याने तो संपूर्ण सामन्यातून बाहेर फेकला गेला. अशा परिस्थितीत यानंतर भारतीय हॉकी संघाला संपूर्ण सामना फक्त १० खेळाडूंसह खेळावा लागला. मात्र त्यानंतरही भारतीय हॉकी संघाने चांगला बचाव केला आणि एकही गोल होऊ दिली नाही. त्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
हे ही वाचा..
मुस्लिम मुलांची ट्युशन घेणाऱ्या मुलीलाच केले मुस्लिम; उल्हासनगरात धक्कादायक प्रकार
‘विरोधकांना हवे ते म्हणू द्या, २०२९ मध्ये पुन्हा एनडीएचेच सरकार येणार’
श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन उपक्रमाची उद्यापासून सुरुवात
आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार दिल्लीत !
पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. ज्यामध्ये भारताने ब्रिटनचा ४-२ असा पराभव केला. भारताकडून पहिला शॉट घेण्यासाठी हरमनप्रीत सिंग आला आणि त्याने गोल केला. यानंतर भारताकडून सुखजीत, ललित आणि राजकुमार यांनी गोल केले. यामध्ये भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश याने शूटआऊटमध्ये दोन गोल वाचवत या विजयाचा मोठा हिरो ठरला. दरम्यान, आता भारतीय हॉकी संघ ६ ऑगस्टला उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवला तर एक पदक निश्चित होणार आहे.