प्रसिद्ध कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक ब्राँझपदक जिंकले. कुस्तीतला तो पराक्रम अनेक वर्षे अबाधित होता. विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकण्याचा मान महाराष्ट्रातील एका खेळाडूला मिळाला याचा अभिमान सर्वांना आहे. पण आज याच खाशाबा जाधव यांच्या कोल्हापूरमधील स्मारकाची दुर्दशा पाहून खाशाबा जाधव विस्मृतीत गेले आहेत का, त्यांचाच आपण पराभव केला आहे का, असे प्रश्न निर्माण होतात.
कोल्हापूरमधील भवानी मंडपाच्या जवळ विजय स्तंभाच्या रूपात खाशाबा जाधव व कोल्हापुरातील इतर नामांकित खेळाडूंचे हे स्मारक आहे. त्या स्तंभाच्या टोकावर खाशाबा यांचा छोटा पुतळा आहे. पण हा स्तंभ आता फेरीवाल्यांच्या तावडीत सापडल्याचे दिसते आहे. चपलांचे ढीग घेऊन बसलेले फेरीवाले, गृहोपयोगी वस्तूंचे विक्रेते, त्या स्तंभाच्या पायऱ्यांवर बसलेले लोक अशा स्थितीत आता हा स्तंभ केवळ एक खांब बनून राहिला आहे. तिथे बसलेले फेरीवाले तिथे कचराही करतात, तिथे बसणारे लोक थुंकून ठेवतात. त्यामुळे एका ऑलिम्पिकवीराची झालेली ही दुर्दशा कुणालाही का दिसत नाही, असा सवाल क्रीडारसिकांकडून विचारला जात आहे.
या स्मारकाच्या या अवस्थेबद्दल एका जागरुक नागरिकाने न्यूज डंकाकडे ही माहिती दिली. एकेकाळी याच भवानी मंडपात राजेशाही थाट होता. तिथे राजघराण्याच्या ताफ्यात असलेले हत्ती झुलत आणि स्थानिकांसाठी ती पर्वणी असे. पण आता ती शान संपली आणि स्तंभाची रयाही गेली. या स्तंभावर संगमरवरी पाट्या आहेत. त्यावरील अक्षरे काळानुरूप पुसट होत गेलेली आहेत. त्यावर एका बाजूला कोल्हापुरातील ज्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदविला, त्यांची नावे अभिमानाने लिहिली आहेत. त्यात दिनकर रावजी शिंदे (१९२० अँटवर्प ऑलिम्पिक, कुस्ती), खाशाबा जाधव (१९४८ व १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक, ब्राँझपदक कुस्ती), के. डी. माणगावे (१९५२ ऑलिम्पिक कुस्ती, हेलसिंकी), श्रीरंग जाधव (१९५२ ऑलिम्पिक कुस्ती, हेलसिंकी), बी. जी. काशिद (१९५४ आशियाई कुस्ती मनिला), व्हीव्ही वजनदार (१९४ ऍथलेटिक्स, १९४९ सिलोन आताचे श्रीलंका आंतररआष्ट्रीय विश्वविद्यालय स्पर्धा)
त्याच स्तंभावरील दुसऱ्या बाजूला असलेल्या पाटीवर या स्तंभाचे उद्घाटन १३ फेब्रुवारी १९६०मध्ये लेफ्टनंट जनरल सर यादविंद्र सिंग, महाराजा ऑफ पतियाळा यांच्या हस्ते झाल्याचाही उल्लेख आहे. शिवाय, इतर खेळातील नामांकित खेळाडूंचीही नावे त्यावर कोरली आहेत. त्यात विजय हजारे (१९४३ इंग्लंड), आर. बी. निंबाळकर (१९४६ इंग्लंड), बी. बी. निंबाळकर (१९४९ कॉमनवेल्थ), जे. एम. घोरपडे (१९५३ वेस्ट इंडिज), एस.आर. पाटील (१९५४-५५ न्यूझीलंड), जयसिंह कुसाळे (नेमबाजी), संभाजी लहू वरुटे (कुस्ती), रमेश कुसाळे (एशियन गेम्स, नेमबाजी) दादू चौगुले (राष्ट्रकुल रौप्यविजेते, कुस्ती) यांचा समावेश आहे.
अशा दिग्गज खेळाडूंची ज्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर केले, त्यांच्या कामगिरीला आज अशा प्रकारे दुर्लक्षित केले गेल्याचे दुःख स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी यंत्रणा, जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याआधी, याच स्तंभाभोवती सुरक्षाकडे होते. त्यामुळे त्या स्तंभाची सुरक्षितता कायम होती. पण आता फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलेला हा स्तंभ हळूहळू विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात तो तिथून उचकटून कुठेतरी दुसरीकडे उभा केला जाण्याचीही भीती लोक व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांनी दिली समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ
माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या नातीचा सासरच्यांकडून छळ
…म्हणून जी-२० पाहुणे यापुढे गुलमर्गला जाणार नाहीत!
सुषमा अंधारेंनी ठाकरेंवर असे काय गारुड केले?
या परिसराची हृद्य आठवण क्रीडासमीक्षक रणजित दळवी यांनी सांगितली. ते म्हणतात की, याच संकुलात छत्रपती राजाराम विद्यालय आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत हे प्रारंभी शिक्षक होते. तिथे ते एनसीसीची कवायत करून घेत असत. त्यावेळी ते लेखक नव्हते. ही कवायत याच भवानी मंडपात होत असे. एनसीसीचे मुख्यालयही याच संकुलात होते. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल तिथे होते. अनेक नामवंत विद्यार्थीनी तिथेच घडल्या. रेव्हरंड टिळकांच्या नात मीरा भागवत त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. याच भवानी मंडपाच्या परिसरात राजाराम महाराजांचा रथ निघत असे. नवरात्रातल्या त्या उत्सवात रथासोबत हत्ती घोडे, उंट, नगारखाना असा तामझाम होता. ६०-७०चा तो काळ होता. राजाराम रायफल्समधील सैनिक जुन्या पेहरावात चालत असत. ते बघण्यासाठी दुतर्फा लोक जमत. शाहू मोतीबाग तालीम जवळच आहे. त्यात अनेक मातब्बर कुस्तीगीर घडले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण व रौप्यविजेते गणपतराव आंदळकर (अर्जुन विजेते) हे याच तालमीत खेळले. याच भवानी मंडपात बरची बहाद्दर हा हत्ती असे. त्याचे निधन झाल्यावर कोल्हापूर रडले होते. त्याची मोठी अंत्ययात्रा याचठिकाणाहून निघाली होती. अशी ही परंपरा असलेल्या या परिसराला अवकळा का आली, याची खंत वाटते.