टोकियो येथे उद्या २३ जुलै रोजी ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळा साजरा होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हे उद्घाटन होईल. ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी प्रत्येक देश उत्सुक आहे. भारताला देखील यावेळेस २१ पदके मिळतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. उद्घाटनाच्या वेळीस होणाऱ्या संचलनात भारताचे २० खेळाडू सहभागी होणार आहेत. कोरोनामुळे संपूर्ण पथक या सोहळ्यात दिसणार नाही.
यंदा होत असलेली ऑलिंपिक स्पर्धा ही गेल्यावर्षीच होणार होती. परंतु, गेल्या वर्षी कोरोनाने जगभर हाहाकार माजवल्याने तेव्हा ही स्पर्धा भरवणे शक्य झाले नव्हते. ती यंदा होत आहे. असे असले, तरीही टोकियो शहरात अजूनही आणीबाणी लागू आहे. खेळाडूंना बायोबबलमध्ये रहावे लागत आहे आणि ऑलिंपिक स्पर्धा देखील प्रेक्षकांविना होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेवरील कोरोनाचे सावट पूर्णपणे गेलेले नाही. या परिस्थितीतही खेळाडू आणि चाहत्यांमध्ये या स्पर्धांबद्दलचा चांगलाच उत्साह जाणवत आहे.
हे ही वाचा:
चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार
चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित
चीनमध्ये पुरामुळे २५ पेक्षा जास्त मृत्यू
आमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही
देशाचा ध्वजवाहक हा त्या देशाच्या संघाचे नेतृत्व करणारा असतो. त्यामुळे भारतीय संघाचे ध्वजवाहक म्हणून भारतीय ऑलिंपिक संघटनेने ६ वेळा विश्वविजेती बॉक्सर एम सी मेरी कोम आणि राष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याची उद्घाटनाच्या दिवशीचे ध्वजवाहक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबरोबरच कुस्तीगीर बजरंग पुनिया याची समारोपाच्या दिवशीचा ध्वजवाहक म्हणून निवड केली आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय ऑलिंपिक संघटनेने भारतीय संघाला २१ पदके मिळतील असे भाकित व्यक्त केले आहे. त्यामुळे काही खेळाडूंकडून या स्पर्धेतील कामगिरीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ॲथलेटिक्समध्ये द्युती चंद हीच्या कामगिरीकडे लक्ष असेल तर मागच्या ऑलिंपिकच्या वेळेस रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेली बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिच्याकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा आहेतच, परंतु त्याशिवाय पुरुषांमधील खेळाडूंमध्ये बी साई प्रणित याच्याकडून देखील उत्तम कामगिरीच्या अपेक्षा भारतीयांना आहेत.
बॉक्सिंगमध्ये देखील भारतीय खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आहे. भारताची ध्वजवाहक मेरी कोम यावेळी उत्तम प्रदर्शन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अनेक भारतीय खेळाडूंनी यापूर्वी आपल्या क्षमता विविध वेळेस सिद्ध केलेल्या असल्यामुळे त्यांच्याकडून देखील पदकाची अपेक्षा केली जात आहे. त्यात अमित पंघल, विकास किशन, लव्हलिना बोर्गोहेन यांच्याकडून आशा आहेत.
नेमबाजी या खेळात भारताचे मोठे पथक आहे. त्यातही एकापेक्षा एक सरस असे नेमबाज सहभागी झाले आहेत. त्यामुळे नेमबाजांकडून यावेळी पदकांची लयलूट होईल असा दाट विश्वास व्यक्त केला जात आहे. राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, मनू भाकर, अंजुम मुदगिल, अपूर्वी चंडेला, दिव्यांश पन्वर, सौरभ चौधरी असे खेळाडू प्रामुख्याने छाप पाडण्यास सज्ज आहेत.
हॉकीचे दोन्ही संघ यात सहभागी झाल्यामुळे पुन्हा एकदा हॉकीची ऑलिम्पिक परंपरा आपल्याला राखता येईल का, याबद्दल उत्सुकता आहे.