भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना दिवसागणिक अधिकच रंगतदार होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने भारतीय संघावर ९९ धावांची आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या डावात खेळायला आलेल्या भारतीय संघाने धावफलकावर ४३ धावा चढवल्या असून त्या बदल्यात भारताने आपला एकही फलंदाज गमावलेला नाही.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंड संघ फार काही बऱ्या परिस्थितीत नव्हता. पहिल्याच दिवशी त्यांचे तीन फलंदाज बाद झाले होते. तर धावफलकावर फक्त ५२ धावाच दिसत होत्या. दुसऱ्या दिवसाची सुरुवातही इंग्लिश संघासाठी फार काही चांगली झाली नाही. अवघी एक धाव करत ओव्हर्टन माघारी परतला. तर त्याच्या पाठोपाठ मलानही बाद झाला. धावफलकावर केवळ ६२ धावा असताना इंग्लंडचा निम्मा संघ बाद झाला होता.
हे ही वाचा:
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर
जितेंद्र आव्हाडांच्या ‘कथित’ ऑडियो क्लिपमुळे ‘साहेबांचे’ महिला धोरण पुन्हा चर्चेत
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण
पण त्यानंतर जॉनी बेरस्टो आणि ओली पोप हे इंग्लंडचे तारणहार झाले. त्यानंतर मोईन अली आणि क्रिस वोक्सने धुरा सांभाळली. या मध्ये क्रिस वोक्स (५०) आणि ओली पोप (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली तर मोईन अली (३५) आणि बेरस्टोने (३७) त्यांना चांगली साथ दिली. त्यामुळे इंग्लंड संघ २९० धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यांनी ९९ धावांची तोकडी का होईना पण आघाडी घेतली.
भारतीय संघ दुसऱ्या डावात खेळण्यासाठी उतरला तेव्हा तब्बल १६ षटकांचा खेळ बाकी होता. पण भारतीय फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत धावफलकावर ४३ धावा चढवल्या. तर त्या बदल्यात एकही फलंदाज बाद झाला नाही. या सामन्याच्या दृष्टीने आजचा तिसरा दिवस फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या दिवसात भारतीय फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभी करणे आणि आपले फलंदाज बाद न होणे महत्त्वाचे आहे तसे झाल्यास हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी भारतीय संघाला असेल.