पावसाळ्यामुळे समुद्रातील कचरा बाहेर फेकला जातो. त्याचप्रमाणे समुद्रातील तेलही बाहेर फेकले जाते. मुंबईच्या किनाऱ्यावरही सोमवारी तेलगोळे आढळून आले आहेत. सोमवारी कफ परेड येथील समुद्र किनाऱ्यावर तेलगोळे दिसून आले आहेत. यामुळे समुदातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.
समुद्रात फिरणाऱ्या जहाज आणि बोटींमधून मोठ्या प्रमाणात तेल गळती होत असते. ओएनजीसीच्या प्रकल्पामुळेही समुद्रात मोठ्या प्रमाणात तेल गळती होत असल्याचा अंदाज आहे. पावसाळ्यात समुद्रातील कचरा जसा बाहेर फेकला जातो तसेच हे तेलही किनाऱ्यावर फेकले जाते. हे तेल वाळूत मिसळल्यामुळे त्याचे गोळे तयार होतात. समुद्रातील जैवविविधतेला यापासून धोका आहेच शिवाय याचा धोका माणसांनाही आहे. कफ परेडच्या किनाऱ्यावर हा प्रकार प्रथमच घडत असल्याची माहिती ‘अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती’ चे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितली.
हे ही वाचा:
लोकांना गंडा घालून हॉलिडे कंपनीने लावले टाळे
रस्त्यांचे काँक्रिटीकरण तर झाले आता पाणी कसे मुरणार?
लसीकरणात अमेरिकेची का झाली घसरण?
या किनाऱ्यापासून जवळच समुद्रात असलेल्या १६ एकरचा खडक शिवस्मारकासाठी निवडला आहे. या खडकावर आणि किनाऱ्यावर मासे अंडी घालतात. गीतानगर आणि जी. डी. सोमाणी शाळेजवळ काही प्रमाणात खारफुटी आहेत. त्यामुळे किनाऱ्यावर असे तेलाचे थर का येत आहेत, याच्या मागच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे आणि किनारा स्वच्छ केला पाहिजे, अशी मागणी तांडेल यांनी केली आहे.
मुंबईतील जुहूच्या किनाऱ्यावरही तेलाचे तवंग जून महिन्यात वाहून आले होते. मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्री वादळामुळे समुद्रातील बोटींची आणि जहाजांची हानी झाली त्यातून हे तेल किनाऱ्यावर आले असावे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.