…आणि ६३ वर्षीय मिनती यांनी केली घर, संपत्ती रिक्षावाल्याच्या नावे

…आणि ६३ वर्षीय मिनती यांनी केली घर, संपत्ती रिक्षावाल्याच्या नावे

संपत्तीवरून एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या नातेवाईकांची उदाहरण कमी नाहीत. पण आपली अव्याहत सेवा करणाऱ्या एका परक्या व्यक्तीला त्याच्या सचोटीच्या व्यवहाराबद्दल सगळी संपत्ती नावावर केल्याचे उदाहरण विरळाच. कटक, ओदिशा इथे असे उदाहरण पाहायला मिळाले.  एकही नातेवाईक संकटाच्या क्षणी पाठीशी उभा राहिला नाही, पण ज्या रिक्षाचालकाने निरपेक्षपणे सेवा केली, हवे नको ते पाहिले त्याच्या नावे घर, दागिने अशी जवळपास १ कोटींची संपत्ती ओदिशातील एका ६३ वर्षीय महिलेने केली. या महिलेच्या या दानशूरतेचे, माणुसकीचे देशभरातून कौतुक होत आहे.

सुताहत येथील मिनती पटनायक यांनी आपले तीन मजली घर, दागिने आणि आपल्या ताब्यातील सगळी संपत्ती रिक्षाचालक बुधा समल यांच्या नावे केली आहे. गेले दोन दशके या रिक्षाचालकाने पटनायक यांची निस्वार्थ सेवा केली.

जवळपास २५ वर्षे हा रिक्षाचालक या कुटुंबाची सेवा करत होता. पण गेल्या वर्षी मिनती यांचे पती किडनीच्या आजारामुळे निधन पावले. त्यातच त्यांची मुलगी कोमल हिचेही हृदयविकाराने निधन झाले. अशावेळी मिनती या खचून गेल्या होत्या. त्या म्हणतात की, पती आणि मुलगी गमावल्यानंतर मी पुरती खचून गेले होते. पण या संकटकाळात माझे कोणतेही नातेवाईक मदतीला धावून आले नाहीत. मी एकटीच होते. पण या रिक्षाचालकाने आणि त्याच्या कुटुंबियांनी मला साथ दिली. माझ्या प्रकृतीची काळजी करताना त्यांनी कसलीही अपेक्षा बाळगली नाही.

त्यामुळे मी कायदेशीरदृष्ट्या सगळी संपत्ती बुधा यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझ्या निधनानंतर त्यांचा छळ होऊ नये, त्यांच्यापुढे कोणतेही संकट उभे राहू नये.

बुधा हे रिक्षा ओढत. रॅवनशॉ कॉलेजमध्ये मिनती यांच्या मुलीला ते सोडत असत. त्यांनी अशी सेवा अनेक वर्षे केली. त्यांच्यावर माझा विश्वास होता. त्यामुळे मी दिलेली संपत्ती हे मोठे कार्य नाही तर त्या संपत्तीवर त्यांचाच खरा हक्क होता.

मिनती यांच्या तीन बहिणींनी या निर्णयाला विरोध केला पण मिनती आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांनी आपल्या निधनानंतर ही सगळी संपत्ती बुधा यांच्याच कुटुंबियाला मिळेल याची तजवीज केली.

 

हे ही वाचा:

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

‘शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही’

बाबासाहेब पुरंदरेंना मान्यवरांची आदरांजली

 

बुधा यावर म्हणाले की, माँ यांनी हा खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. माझ्या आणि कुटुंबियांच्या जीवनमानावर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल. आता मी माझ्या कुटुंबियांसह एका छताखाली राहू शकेन.

Exit mobile version