ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांना दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांमध्ये मदत दिली जात असल्याबद्दल भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. प. बंगालचे एक मंत्री ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दोन हजार रुपयांच्या नोटांच्या रूपात दोन लाख रुपये मदतनिधी देत आहेत, असा आरोप पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी केला आहे.
प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी मंगळवारी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील एका कुटुंबाकडे दोन हजार रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवलेले दिसत आहे. मजुमदार यांच्या म्हणण्यानुसार, ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात कुटुंबातील एक सदस्य गमावल्यानंतर या कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून पैसे मिळाले.
हे ही वाचा:
कोल्हापूरमध्ये व्हाट्सऍपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक
‘बीबीसीची करचुकवेगिरीची कबुली म्हणजे भारतविरोधी अजेंड्याला पाठिंबा’
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार
युक्रेनमधील धरण कोसळल्यानंतर ग्रामस्थांचे पलायन
“ममता बॅनर्जींच्या सूचनेनुसार, राज्याचे एक मंत्री तृणमूल पक्षाच्या वतीने पीडितांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देत आहेत. या संदर्भात मी तुमचे आभार मानतो. मात्र मला एक प्रश्न विचारायचा आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बंडलचा स्रोत काय आहे?’ असे ट्वीट त्यांनी केले आहे. बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरू असताना पीडितांच्या कुटुंबीयांना या नोटा देणे हा योग्य निर्णय आहे का, असा सवालही मजुमदार यांनी केला.
‘सध्या बाजारात दोन हजार रुपयांच्या नोटांचा पुरवठा कमी आहे आणि बँकांमार्फत त्यांची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे असहाय कुटुंबांना दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन त्यांच्या अडचणी वाढवल्या जात नाहीयेत का? दुसरे म्हणजे हा तृणमूल काँग्रेसचा काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग नाही का?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘एखाद्याला दोन हजार रुपयांची नोट देणे हे बेकायदा नाही. कारण हे चलन अद्याप वैध आहे. त्यामुळे मजुमदार यांचे ट्वीट ‘निराधार’ आहे. दोन हजार रुपयांची नोट अवैध आहे का? आज, जर कोणी कोणाला दोन हजारांची नोट दिली तर तो बेकायदा किंवा काळा पैसा नाही,’ असे घोष म्हणाले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी कोरोमंडल एक्स्प्रेसमधील जखमी प्रवाशांची भेट घेतली. त्यांच्यावर सध्या कटकमधील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ‘पश्चिम बंगालमधील मरण पावलेल्या १०३ प्रवाशांची आतापर्यंत ओळख पटली आहे, तर अद्याप ३० बेपत्ता आहेत. ‘मी आधीच मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये आणि गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना झालेला मानसिक आणि शारीरिक ताण पाहता त्यांना १० हजार रुपयांची मदत दिली जाईल,’ असे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.