‘मुंबई सागा’ या चित्रपटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केलेल्या बदनामीप्रकरणी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सेन्सॉर बोर्डने या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग काढून टाकल्याचे पत्र यासंदर्भात तक्रार करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांचे वकील प्रकाश सालसिंगीकर यांना पाठविले आहे. पण या बदनामीप्रकरणी कोणत्याही प्रकारची माफी मागितलेली नसल्यामुळे कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा असल्याचे सालसिंगीकर यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात सालसिंगीकर यांनी भिंगार्डे यांच्यावतीने पाठवलेल्या मानहानीच्या नोटिशीवर सुपर कॅसेट लिमिटेड यांच्या वकिलांमार्फत उत्तर पाठवण्यात आले होते. मात्र त्यांनी या बदनामीप्रकरणी माफी मागितलेली नव्हती. आता सेन्सॉर बोर्डाने पत्र पाठवून तो आक्षेपार्ह भाग वगळण्यात आल्याचे कळविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, ३१ मे २०२१ ला आपण पाठविलेल्या नोटिशीला अनुसरून ‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे जे छायाचित्र वापरण्यात आले आहे, तो भाग काढून टाकण्यात आला आहे. हा बदल बोर्डाने प्रमाणित केला आहे आणि तशी नोंद सीबीएफसी प्रमाणपत्र यू/आर ३३ वर करण्यात आली आहे.
याबाबत भिंगार्डे यांचे वकील प्रकाश सालसिंगीकर यांचे निर्मात्यांच्या या उत्तराबद्दल म्हणणे आहे की, हा सिनेमा पूर्णपणे व्हाईट फीदर फिल्म निर्मित आहे. सदर चित्रपटाच्या प्रॉडक्शनमध्ये सुपर कॅसेट्स यांचा कुठलाही सहभाग नाही. चित्रपटाचे निर्देशक संजय गुप्ता व रॉबिन भट असून संवादलेखन विशाल वैभव यांनी केले आहे, असे सांगून त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ही जबाबदारी अन्य लोकांवर ढकललेली आहे.
हे ही वाचा:
टाटा आणणार १० इलेक्ट्रिक गाड्या
बांधकामांची पाहणी न करताच रेशन कार्ड, पाणी, विद्युतपुरवठा कसा होतो?
अजित दादांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत दादांचे पत्र
रवि शंकर प्रकरणात केंद्राची ट्वीटरला चपराक
या नोटिशीमध्ये ‘मुंबई सागा’च्या निर्मात्यांनी म्हटले आहे की, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर करीत असून ओटीटी प्लॅटफॉर्मला सदर विवादित इमेज अस्पष्ट (Blurr) करण्यासाठी निर्देश दिले आहेत. असे असले तरी कुठल्याही प्रकारची माफी त्यांनी या जबाबात मागितलेली नाही.
या चित्रपटात ९०च्या दशकातील बदलत्या मुंबईचे चित्रण करण्यात आले आहे. त्यातील अभिनेता जॉन अब्राहम आणि इतरांमधील संवादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख अप्रत्यक्षपणे येतो. शाखा आणि सेना असे शब्द त्यात वापरले जातात. शिवाय, स्वयंसेवकांचे हाती दंड धरलेले, प्रणाम करतानाचे छायाचित्रही त्यात दिसते. ‘भाऊ की सेना’ असा शब्दप्रयोग करताना हे छायाचित्र दाखविण्यात येते. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. हे छायाचित्र दाखवताना ते अस्पष्टही करण्यात आलेले नव्हते. मुंबई पोलिसांमध्ये भाऊ या पात्राकडून त्याच्या सेनेतील लोकांची भर्ती केली जाते, असे नमूद केले होते. भाऊ नामक व्यक्ती मुंबई पोलिसांवर नियंत्रण ठेवते असाही त्यात उल्लेख आहे. एकूणच भाऊच्या सेनेतील लोक हे पोलिस दल नियंत्रित करत आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न होता. भिंगार्डे यांनी या गोष्टींना आक्षेप घेतला.
भिंगार्डे यांचे वकील सालसिंगीकर यांनी म्हटले आहे की, तो आक्षेपार्ह प्रसंग काढून टाकल्याचे सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे. पण निर्मात्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. कालपरवापर्यंत जे दाखवले जात होते, त्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. आमची तशीच मागणी आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाईचा मार्ग आमच्यासाठी मोकळा आहे