लालबाग अपघात: जोडीदारासोबत खरेदी करायला गेलेल्या नुपुरची स्वप्ने राहिली अधुरी…

दारुड्या प्रवाशामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

लालबाग अपघात: जोडीदारासोबत खरेदी करायला गेलेल्या नुपुरची स्वप्ने राहिली अधुरी…

मुंबईतील लालबागमध्ये नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये दोन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात  एका कुटुंबाने कमावणाऱ्या मुलीला तर एका कुटुंबाने होणाऱ्या सुनेला गमावले आहे. रविवारी (१ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास एका मद्यधुंद प्रवाशाने बस चालकाशी वाद घालून बसचे स्टेअरिंग हिसकावून घेतले आणि त्यामुळे बस अनियंत्रित होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात ९ जण जखमी झाले. यामध्ये जखमी झालेल्या नुपूर मणियारचा मृत्यू झाला. नुपूरच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेस्टची ६६ क्रमांकाची बस राणी लक्ष्मी चौकच्या दिशेने जात होती. कमलेश प्रजापती (वय ४० वर्षे) हे बसचे चालक होते. गणेश टॉकीजच्या दरम्यान एका दारुड्या प्रवाशाने चालकाबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर झालेल्या झटापटीत त्याने स्टेअरिंग हिसकावून घेतलं. त्यामुळे अचानक वाहकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस अनियंत्रित होऊन फुटपाथच्या दिशेनं गेली. या दरम्यान, बसची पादचारी, कार आणि दुचाकींना धडक बसली. यात नऊ जण जखमी झाले. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, यामध्ये नुपुरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे ही वाचा : 

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे गेल्यावरून आरोप प्रत्यारोप

प. बंगालमध्ये बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक एकमताने मंजूर

इस्लामिक सेंटर हॅम्बर्गचा माजी प्रमुख जर्मनीमधून हद्दपार

ती सुरतेची लूट नव्हती…पंतप्रधान मोदींचे ते भाषण व्हायरल!

 

कोरोनाच्या काळात नुपुरच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर अनुकंपा तत्त्वावर नुपूरला आयकर खात्यात दोन महिन्यांपूर्वीच नोकरी मिळाली होती. आई आणि बहिणीची जबाबदारी नुपूर घेत होती. तसेच नुपुरचे नुकतेच लग्न ठरले होते, लवकरच ती विवाह बंधनात अडकणार होती. सर्वकाही सुरळीत चालले होते. मात्र, नशिबाने घात केला आणि अपघातात नुपूरने हाकनात जीव गमावला. नुपूर आपल्या जोडीदारासोबत खरेदी करण्यासाठी गेली होती आणि तेव्हाच हा अपघातात झाला. उपचारासाठी नुपुरला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामध्ये तिचा जोडीदारही जखमी झाला. नुपुरने रंगविलेली सर्व स्वप्ने क्षणार्धात नष्ट झाली. नुपूरच्या गेल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आरोपी दत्ता मुरलीधर शिंदे हा या संपूर्ण घटनेला जबाबदार आहे. आरोपीने मद्यप्राशन करून बसचालकाशी हुज्जत घातलीच नसती तर आज दोन्ही कुटुंब सुखी असते. दरम्यान, काळाचौकी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आरोपी दत्ता मुरलीधर शिंदे (वय ४० वर्षे) याला अटक केली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Exit mobile version