आधीच वेतनाअभावी पिचलेल्या, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाची प्रतीक्षा करता करता मृत्युला सामोरे जावे लागले.
असे तब्बल ४५०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. पतीच्या निधनानंतर निदान आपल्याला तरी ही पेन्शनची रक्कम मिळेल ही आशा बाळगणाऱ्या अडीच हजार विधवांनीही प्राण सोडले आहेत. एकूणच राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची अवस्था नाजूकच होत चालली आहे.
एसटीत सध्या ९७ हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या बदल्याही होत असतात. दुसऱ्या विभागात बदली झाल्यानंतर त्या आदेशासोबत कर्मचाऱ्याचे अखेरचे वेतन प्रमाणपत्र आणि पेन्शनबाबतची माहिती जोडली जात असते. त्यानुसार नव्या कार्यालयातून पेन्शनची रक्कम कार्यालयात पाठवली जाते. पण ते प्रमाणपत्र देण्यासच एसटीती नोकरशहा टाळाटाळ करतात. त्यामुळे वेतनातून पेन्शनची रक्कम कापली जात नाही. मग सेवानिवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांना आपल्या पेन्शनबाबत नीट माहिती मिळू शकत नाही. या सगळ्या प्रक्रियेत एखाद्या कर्मचाऱ्याची पेन्शनची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचेही प्रकार घडले आहेत.
पतीच्या निधनानंतर त्यांच्या विधवांनीही या पेन्शनच्या रकमेसाठी एसटी कार्यालयाचे खेटे घातले पण त्यांच्या पदरी काहीही पडले नाही. अशा अडीच हजार विधवांचा मृत्यू झालेला आहे.
प्रशासन शाखेत पेन्शनचे काम पाहणारा कर्मचारीही वारंवार बदलला जातो त्यामुळे या कामात व्यत्यय येतो, असे एसटी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी म्हटले आहे. पेन्शन न मिळण्यास एसटीतील संबंधित अधिकारी व नोकरशहा जबाबदार आहेत.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया
बूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य
कास पठार पर्यटकांसाठी खुले! पण केव्हापासून??
दहावी-बारावी शिकलेल्या डॉक्टरांची गोवंडीत क्लिनिक्स ! वाचा…
पेन्शनच्या या घोळाला पुढील गोष्टी कारणीभूत आहेत. पेन्शनबाबत लेखा व आस्थापना शाखा एकत्र काम करत नाहीत. त्यामुळे पेन्शन केस तयार होत नाही. बदली झालेल्या कर्मचाऱ्याची मागील माहिती ऑनलाइन कुणी भरायची हा वाद नित्याचाच असतो. केवळ नाशिक, पिंपरी-चिंचवड, वांद्रे येथेच ऑनलाइन फॅमिली पेन्शन आहे. इतर ठिकाणी ऑफलाइन काम होते.