ऐरोली खाडी अंतर्गत येणाऱ्या गोठीवली गावालगत असलेल्या खाडीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे या परिसरातील मासेमारांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित प्रकाराबद्दल मदत करावी, अशी मागणी स्थानिक मासेमारांनी केली आहे. दुषित पाणी, खाडीतील गाळ आणि खारफुटीवर असलेल्या किडी यामुळे मासे मृत झाल्याचे मासेमारांनी सांगितले आहे.
बेलापूर ते ऐरोली दरम्यान नवी मुंबईला विस्तृत खाडी किनारा लाभला आहे. या खाडीकिनारी राहणारे अनेक लोक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. काही लोक कालवा पद्धतीने माशांची शेती करून उत्पादन करत आहेत. मात्र इतक्या मोठ्या संख्येने मृत माशांना पाहून स्थानिक मासेमार हवालदिल झाले आहेत.
हे ही वाचा:
‘बेस्ट’ला महाराष्ट्र बंदचा बसला दोन कोटींचा फटका!
जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’
एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर
खाडीतील गाळ काढण्याची परवानगी मिळत नसल्याने माशांना ऑक्सिजन मिळण्यास अडचण निर्माण होते. तसेच खाडीतील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात किडी पडल्यामुळे त्या पाण्यात पडत असतात. त्यामुळे पाणी दुषित होते. यामुळेच मासे मृत झाल्याचा आरोप मासेमारांनी केला आहे. गोठवली गावातील गुणानाथ म्हात्रे यांच्या खाडीतील मासे मृत झाल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हे नुकसान काही केल्या भरून निघणार नाही. मात्र, भविष्यात असे काही पुन्हा घडी नये यासाठी खाडीतील गाळ काढण्याची गरज आहे.
भरतीच्या वेळी पाण्यासोबत कचरा वाहून येतो. शिवाय खारफुटीचा कचरा अडकून बसून शेवाळ जमा होते. त्यामुळे माशांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मासे मृत होतात, असे मासेमार संघटनेचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांनी सांगितले.