कोरोनामुळे सगळेच आर्थिक विवंचनेत आहेत. अशावेळी निर्बंध सैल करून पोटापाण्याची व्यवस्था करण्याचा मार्ग खुला करण्याची मागणी विविध गटाकडून होत आहे.
देशात कोरोना महामारी सुरू होऊन गेल्या सव्वा-दीड वर्षापासून हातावर पोट घेऊन जगणारा रंगकर्मी देशोधडीला लागला आहे. असंख्य कलाकार कामाअभावी मेटाकुटीला आले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी रंगकर्मी येत्या सोमवारी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी आंदोलन करणार आहेत. राज्याच्या ३५ जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी हे आंदोलन होणार आहे.
आर्थिक विवंचनेत अडकलेले सर्व रंगकर्मी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. विविध मागण्यांसाठी सगळे रंगकर्मी आता एकवटले आहेत. हिंदमाता चित्रपटगृहासमोर असलेल्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता सगळे रंगकर्मी एकत्र जमणार आहेत. या वेळी सर्वच कलाकार “जागर रंगकर्मीचा ” हा कार्यक्रम सादर करुन आपल्या मागण्यांमागील आक्रोश अनोख्या पद्धतीने सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहेत. रंगकर्मींसाठी रोजगार हमी योजना लागू करावी तसेच कोरोनास्थिती पूर्ववत होईपर्यंत रंगकर्मींना किमान 5 हजार उदरनिर्वाह भत्ता द्यावा याकरता हे आंदोलन करण्यात येणार आहे.
टाळेबंदीच्या काळात रंगकर्मींना खूपच हलाखीचा सामना करावा लागला आहे. यासंदर्भात अनेकदा विनंती करूनही सरकारकडून कुठलीही पावले मात्र उचलली गेली नाहीत.
आंदोलनात निर्माते, नाट्य व्यवस्थापक, बुंकिग क्लार्क, बेंजो पार्टी, शाहीर, तमासगीर, हिंदी व मराठी वाद्यवृंदातील सगळे वादक व गायक, रंगमंच कामगार आदी मंडळी सहभागी होणार आहेत. अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर म्हणाले, की हे आंदोलन राजकारण आणि संस्थाविरहित आहे. कोणी अध्यक्ष नाही. कोणी सेक्रेटरी नाही. कलाकारांनी कलाकारांसाठी सुरु केलेले हे आंदोलन आहे.
हे ही वाचा:
जाहिरात प्रदर्शन नाही, मग करायचं काय?
शास्त्रज्ञांनी प्रथमच टिपल्या ताऱ्याच्या मरणकळा!
सीईटी नसेल तर बघावी लागणार वाट
नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे!
गेल्या दीड वर्षामध्ये ठाकरे सरकारकडून केवळ मदतीचे आश्वासन मिळत आहे. प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नाही. त्यामुळेच अखेर रंगकर्मींना हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे. ठाकरे सरकार केवळ तोंडावर मनोरंजन सृष्टीचा कैवार घेतात, पण प्रत्यक्षात मदत करताना कुठलीही पावले उचलत नाहीत.