या पोलिसांनाही करता येणार ‘वर्क फ्रॉम होम’

या पोलिसांनाही करता येणार ‘वर्क फ्रॉम होम’

दक्षता म्हणून पोलिस महासंचालक कार्यालयाकडून निर्देश

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता पोलीस दलाला दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून शक्य असेल तर ५५ वर्षे पेक्षा अधिक आणि इतर व्याधी असलेल्या पोलिसांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहे. कोरोनाच्या मागील दोन लाटेत राज्यभरात शेकडो पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला होता, यावेळी दक्षता म्हणून हे निर्देश देण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असून त्यात पोलीस दलात देखील हा संसर्ग वाढत आहे. मुंबई पोलिस दलामध्ये सध्यस्थितीत १५४ सक्रिय रुग्ण असून राज्यात २१९ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. ही संख्या अधिक वाढू नये यासाठी पोलिस वसाहती, पोलिस ठाणी, पोलिसांची शासकीय वाहने यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना पोलीस महासंचालक कार्यालकडून देण्यात आलेल्या आहेत. तसेच ५५ वर्षे पेक्षा अधिक वय असलेले तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृद्य शस्त्रक्रिया, कर्करोग, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रतिरोपण या आजाराने ग्रासलेल्या पोलिसांना शक्य झाल्यास घरी बसूनच काम द्या, तसेच त्याच्या आजाराचा आढावा घेऊन ते लोकांच्या संपर्कात येणार नाही, किंवा कमी संपर्कात असेल अशा ठिकाणी त्याची नेमणूक करावी, असे निर्देश पोलीस महासंचालक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

डाव्याच नव्हे तर उजव्या एनजीओंचेही परवाने रद्द

मोदींची गाडी, विरोधक अनाडी

नक्षलवाद विरोधात पोलिसांचे ‘गडचिरोली फाइल्स’

तालिबानचे दारू’बॅन’; कालव्यात ओतले हजारो लीटर मद्य

 

वर्क फ्रॉम होम देण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडुन महाराष्ट्र पोलीस ऍकेडमीचे ऑनलाईन ट्रेनिंग मोडूयल्स तयार करून घेता येईल असे दिलेल्या निर्देशात म्हटले आहे. मागील दोन लाटेत राज्यभरात ५०० तर मुंबईत १२३ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच सद्यस्थितीत पोलीस दलात कोरोनाचे रुग्ण वाढ होत असल्यामुळे दक्षता म्हणून हे निर्देश देण्यात येत आहे.

Exit mobile version