मुसळधार पावसामुळे आधी महाप्रलयासारखी स्थिती…त्यामुळे घर सोडून सुरक्षित जाण्याची आलेली वेळ…आणि आता थोडा पूर ओसरल्यावर घरात आलेला गाळ आणि त्यात रुतलेला संसार पुन्हा एकदा उभा करण्याची धडपड असे चित्र पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी दिसते आहे. कोकणातील रत्नागिरी, चिपळूण, महाड, खेड, सातारा, कोल्हापूर, सांगली, बदलापूर अशा अनेक ठिकाणी हीच तगमग पाहायला मिळते आहे.
पाणी ओसरले तरी घरात सर्वत्र झालेला चिखल, अस्ताव्यस्त पडलेले सामान, पसरलेली दुर्गंधी हे असेच दृश्य आता अनेक भागांतील आहे. कल्याण, बदलापूर, भिवंडी शहरांतील पूरग्रस्त पुन्हा एकदा आपल्या संसाराचा गाडा रुळावर येईल याच चिंतेत आहेत. मुसळधार पावसामुळे गुरुवारी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूर, कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा आणि शहाड भागांत मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. पाणी वाढू लागल्याने प्रशासन आणि काही सामाजिक संस्थांकडून नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था केली होती, तर काही जणांनी नातेवाईकांच्या घरी, टेम्पोसारखी वाहने या ठिकाणी आसरा घेतला होता. गुरुवारपासून पडणारा पाऊस आणि त्यातूनच निर्माण झालेली पूरसदृश्य परिस्थिती कल्याण, बदलापूरकरांना अनुभवायला मिळाली. त्यामुळेच अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.
हे ही वाचा:
मीराबाई चानूने रौप्य पदक ‘उचलले’
मालाडमधील त्या रहिवाशांचे पुनर्वसन होणार तरी केव्हा?
संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे कसले पालक मंत्री? हे तर पळपुटे मंत्री!
श्रीलंकेने घेतली भारताची फिरकी
पाणी ओसरल्यानंतर घरातील नासधूस पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पै पै जमवून उभा केलेला संसार मातीमोल झाला हे पाहून अनेकांचे अवसान गळाले. त्यामुळेच आता पूरग्रस्तांच्या समोर नवे आव्हान उभे आहे. पुराच्या परिस्थितीमधून बाहेर येण्याची धडपड आता पुरग्रस्तांची सुरू झालेली आहे. कोलमडलेल्या संसाराचा गाडा आता नव्याने उभारायला लागणार हेच आव्हान आता सर्वांसमोर आहे. खेडमधील अशाच काही कुटुंबांशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधल्यावर त्यांना अश्रु आवरणे कठीण जात होते. जो काही संसार उभा केला त्याची आता शून्यापासून सुरुवात करावी लागेल असे त्या घरातील स्त्रिया हुंदके देत सांगत होत्या. कर्त्या पुरुषांनाही अश्रु आवरणे कठीण जात होते.
सध्या पूर ओसरल्यानंतर आता घर आणि परिसरातील साफसफाई करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे.
गुरुवारी सायंकाळनंतर अनेक ठिकाणी पाणी ओसरले होते. मात्र पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे सायंकाळी कुणीही घरी परतले नव्हते. शुक्रवारी सकाळीच नागरिकांनी आपल्या घराकडे धाव घेतली. अनेकांच्या घरात चिखलचा थर साचला होता. पुराच्या पाण्यामुळे घरातील फर्निचर आणि सामानाची नासधूस झाली होती. पुराच्या पाण्यामुळे दुर्गंधीसुद्धा वाढली होती. त्यामुळेच घरात किडे, सरपटणारे प्राणी घरात आलेले होते.