शिंदे फडणवीस सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदी भाषेतून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमबीबीएससह सर्व अभ्यासक्रम मराठीतून करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मराठीतून शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे यासाठी कोणतेही बंधन नसेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण स्थानिक भाषेतून देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणे देशातील अनेक राज्य स्थानिक भाषेतून वैद्यकीय शिक्षण देण्याचा निर्णय घेत आहेत. यासंदर्भातील तयारी काही महिन्यांमध्येच पूर्ण होणार आहे. यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत म्हणून तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. समिती याची पाहणी करणार आहे.
हे ही वाचा:
‘एअरबस टाटा’ प्रकरणात भाजपाकडून मोठा खुलासा
पंतप्रधान मोदींची नवी संकल्पना ‘एक देश, एक पोलीस गणवेश’
आता टाटा प्रकल्पाचे खापरही शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यावर
अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी
एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम आता मराठीतून उपलब्ध होणार आहेत. पण सध्या या अभ्यासक्रमात एमबीबीएसला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यात एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ महाविद्यालये आहेत. यामध्ये जवळपास १० हजार ४५ विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये सरकार आणि महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठ १२ तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन महाविद्यालयांचा समावेश होतो. तसेच वैद्यकीय शिक्षण इंग्रजीतून घ्यावे की, मराठीतून याबाबत विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य असेल असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.