आता राम मंदिरात कोणालाही मोबाइल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. शुक्रवारी राम मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्य भाविकांना राम मंदिरात फोन घेऊन जाण्यास यापूर्वीही बंदी होती. मात्र, आता व्हीआयपी व व्हीव्हीआयपीही राम मंदिरात फोन घेऊन जाऊ शकणार नाहीत. परिसरात मोबाइल येऊ नये, यासाठी कठोर देखरेख ठेवली जाणार आहे. राम मंदिराच्या स्तंभामधील खंडित झालेल्या मूर्तीचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे.
प्राणप्रतिष्ठेनंतर अनेक भाविक राम मंदिरात मोबाइल फोन घेऊन जात होते. त्यानंतर सर्वसाधारण भाविकांना मोबाइल आत घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली. त्या दरम्यान ट्रस्टने सुलभ व विशिष्ट दर्शनाची व्यवस्था सुरू केली. या अंतर्गत विशिष्ट पास असणाऱ्यांना एक मोबाइल घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली. तसेच, व्हीआयपी व व्हीव्हीआयपी लोकांनाही मोबाइल घेऊन जाण्याची परवानगी होती. मात्र सर्वसामान्य भाविक आणि व्हीव्हीआयपी भाविक यांच्यात भेद केला जात असल्याची चर्चा सुरू झाली होती.
हे ही वाचा:
नुपूर शर्मांच्या हत्येचा कट: मौलवी सोहेलच्या अटकेनंतर आणखी दहशतवादी पकडले
हम तो डुबेंगे सनम…काँग्रेसने स्पष्ट केला इरादा
त्यांनी निभावला रोल बाकीच्यांचे फक्त झोल
तुम्ही ४०० प्लस जागा द्या, आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू!
या पार्श्वभूमीवर आता मोबाइलवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राममंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले की, मोबाइल फोन राममंदिर परिसरात नेण्यामुळे सुरक्षेला धोका होता. तसेच, भाविक हे रांगेत उभे राहूनच फोटो आणि सेल्फी काढू लागले होते. हे चांगले दिसत नाही. आताही पहिल्यापासून सुलभ आणि विशिष्ट दर्शनाची व्यवस्था सुरू राहील मात्र मोबाइलवर बंदी कायम असेल. तर, चेकिंग पॉइंटवरच भाविकांची तपासणी केली जाईल, असे पोलिस अधीक्षक पंकज पांडेय यांनी सांगितले.