विजांच्या कडकडाटासह रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांची झोप उडवली आहे. या मुसळधार पावसात मुंबईकरांची पार दैना झाली असून शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी पार कंबरेपर्यंत हे पाणी साचले असून यामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी रात्रीची वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळाली आहे. तर वीजपुरवठा खंडित झाल्याचेही घटना समोर आल्या आहेत.
गुरुवार पासून मुंबईत सुरु झालेली संततधार काही थांबायचे नाव घेत नाहीये. मधल्या काही काळात या पावसाचा जोर कमी झालेला दिसला तरी शनिवारी रात्री मात्र या पावसाने रौद्र रूप धारण केले. दादर, सायन, चेंबूर, हिंदमाता, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, वरळी अशा मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेले दिसले. तर मुंबईला लागूनच असलेल्या मीरा रोड, कोपरखैरणे सारख्या भागातही पावसाचे थैमान पाहायला मिळाले.
हे ही वाचा:
…पुरावा द्या, नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकतो!
विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा
भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकेची एमएच-६०आर हेलिकॉप्टर्स दाखल
‘या’ शिवसेना नेत्यामागेही लागला ईडीचा ससेमिरा
अनेक भागात रेल्वे रूळांवरही पाणी साचले असून रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गवारीं अनेक रूळ हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून. एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
मुंबईला झोडपून काढणाऱ्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांनाच नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. तर शहरातील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे चित्र आहे. यामुळे या परिसरातील वस्त्या खाली केल्या जात असून नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये हलवले जात आहे. मिठी नदी ही ओव्हरफ्लो होऊन वाहताना दिसत आहेत. तर नदीने ४.२ मीटर ही धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अपघातांची मालिका
पावसाच्या या हाहाकारामुळे मुंबईतील काही भागात अपघाताच्याही घटना घडल्याचे समोर आले आहे. चेंबुर, भांडूप, विक्रोळीमध्ये भिंत कोसळून काही नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनास्थळी एनडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.