नोएडातील भंगार माफिया रवी काना, मैत्रीण काजल झा यांना थायलंडमधून अटक!

दोघेही बराच काळपासून होते फरार

नोएडातील भंगार माफिया रवी काना, मैत्रीण काजल झा यांना थायलंडमधून अटक!

ग्रेटर नोएडाचा सर्वांत मोठा भंगार माफिया आणि स्टील तस्कर रवी काना आणि त्याची मैत्रीण काजल झा यांना थायलंडमधून अटक करण्यात आली आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी नोएडा पोलिसांकडून औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे समजते. दोघेही बराच काळपासून फरार होते.

नोएडा पोलिसांनी फरार दोघांविरुद्ध लुकआउट आणि रेड कॉर्नर नोटीस जाहीर केली होती. ते थायलंडला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून, नोएडा पोलिस सतत थायलंड प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
गँगस्टर रवी काना याच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. एका महिलेने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर १ जानेवारी २०२४पासून पोलीस रवी कानाच्या शोधात होते. पोलिसांनी रवी कानाच्या विविध संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले, परंतु तो फरार होता.

त्यानंतर पोलिसांनी काजल झाविरुद्ध गुन्हा दाखल केला. रवी कानाच्या पत्नीसह अन्य १४ जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.न्यायालयात दाखल केलेल्या ५०० पानांच्या आरोपपत्रानुसार पोलिसांनी रवी कानाला बेकायदा कृत्यांचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला असून त्याची मैत्रीणही त्याच्या गुन्ह्यात समान भागीदार असल्याचे मानले जात होते.रवी काना याच्यावर बलात्कारासह ११ गुन्हे दाखल आहेत. ३० डिसेंबर २०२३ रोजी नोएडातील पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पाच जणांमध्ये रवी कानाचाही समावेश होता. तसेच, तिला धमकावण्यासाठी या कृत्याचा व्हिडीओही बनवण्यात आला होता.महिलेने पोलिसांना सांगितले की, काही महिन्यांपूर्वी ती नोकरीच्या शोधात होती. रवी कानाचे सहकारी राजकुमार आणि मेहमी यांनी नोकरीच्या बहाण्याने प्रलोभन दाखवून कानाची भेट घडवून आणली. या दोघांनी तिला एका ठिकाणी नेऊन तिथे रवी काना, त्याचे इतर दोन सहकारी आझाद आणि विकास यांच्यासह पाच आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.

हे ही वाचा:

‘निवडणुकीचे वार्तांकन करण्याची परवानगी न दिल्याचा ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा आरोप दिशाभूल करणारा’

‘बेकायदा स्थलांतरितांना रवांडामध्ये पाठविण्याच्या मार्गात आता कसलेही अडथळे नाहीत’

मुंबईत सूर्य आग ओकणार; आठवड्याअंती उकाडा वाढणार

पतंजलीकडून पूर्वीच्या माफीनाम्यापेक्षा अधिक ठळक, आकाराने मोठा माफीनामा जारी

पोलिसांनी सील केली ३५० कोटींची मालमत्ता
पोलिसांनी या प्रकरणी नोएडा आणि दिल्लीतील सुमारे ३५० कोटी रुपयांची मालमत्ता सील केली. यामध्ये दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी येथील रवी कानाच्या ८० कोटी रुपयांच्या बंगल्याचा समावेश आहे, जो त्याने आपल्या मैत्रिणीच्या नावावर खरेदी केला होता. नोएडा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील खुर्जा येथील ४० गुंठे जमीनही सील केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विविध गुन्ह्यांमधून कमावलेल्या पैशातून ही मालमत्ता जमवली होती.

Exit mobile version