महाविकास आघाडी ही सोयीची सोयरीक होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि ही सोय संपली. त्यामुळे सोयरीकही कधी तरी संपणार आहे. मविआचा कारभार आटोपत असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची रोज सकाळ-संध्याकाळ सालटी निघणार ही बाब मात्र स्पष्ट झालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरबसल्या घोडचुकांचे वाभाडे आजवर विरोधक काढत होते, आता घरातील लोकही काढू लागलेत. सुरूवात ठाकरेंचे सर्वात मोठे पाठीराखे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. फारसे लोक सांगाती उरले नसल्याचे हे परिणाम.
सध्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठा गदारोळ उठला आहे. परंतु या गलक्यातही ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेतून शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची जी काही पिसं काढली आहेत, त्याची चर्चा होते आहे.
‘मुख्यमंत्री झाल्यावर शर्ट-पॅण्ट अशा मुंबईकर मध्यमवर्गीय पोशाखात सहजपणे वावरण्याचे सर्वांनाच एक अप्रुप होते. त्यांनी फेसबुकवर केलेला सहज संवाद लोकांना भावला.’ अशी अपवादात्म वाक्य या आत्मकथेत उद्धव ठाकरे यांचे कौतुक करणारी आहेत, बाकी सगळी निरमा वॉशिंग पावडरने केलेली लख्ख धुलाई आहे.
मविआ सत्ता राबवित असताना सरकारची सूत्र पवारांकडे होती. मात्र तरीही त्यांच्यासारख्या नेत्याला स्वत:चे आजारपण आणि वय बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर जावे लागत असे. ही बोच मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात निश्चित असणार ना. पवारांनी ही खदखद आत्मकथेतून व्यक्त केली आहे. ‘ठाकरेंच्या आजारपणामुळे रश्मी ठाकरे यांच्याकडून वेळ घेऊन मला त्यांना भेटायला जावे लागे’, असे पवारांनी आत्मकथेत म्हटले आहे.
‘मंत्रालयात उद्धव यांचे फक्त दोनदा येणे, आमच्या पचनी पडणारे नव्हते.’ हा ठाकरेंच्या जिव्हारी लागणारा सगळ्यात मोठा आक्षेप. ज्या मुद्यावरून विरोधकांनी ठाकरेंचे वाभाडे काढले, त्याच कायम घरी बसण्याच्या मुद्यावरून पवारांनी ठाकरेंना ठोकले आहे. सामनाच्या अग्रलेखात आज त्याचे कसेबसे उत्तर देण्याचा प्रयत्न शिउबाठाने केलेला आहे. पण म्हणतात ना, बुंद से गई वो हौद से नही आती…
‘मुंबई महाराष्ट्रापासून दिल्ली तोडण्याचा केंद्राचा कधीही विचार नव्हता’, असे सांगून पवारांनी उद्धव यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. बीकेसीतील वज्रमूठ सभेत उद्धव याच मुद्यावर बोलले होते.
महाविकास आघाडीत शिउबाठा हे आता ओझे झालेले आहे. पक्षाचे नाव निशाणी गमावलेल्या नेत्याला कोणी आणि किती काळ खांद्यावर वाहणार? त्यामुळे पवार गेले काही दिवस एकेक झटका देत चालले आहेत. राजकारणात विरोधकाला संपवण्यासाठी झटका वापरत नाहीत, हलाल पद्धत वापरतात. सावज तडफडूनच मारायचे हा इथला नियम आहे.
‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना ठाकरेंनी मित्र पक्षांना विश्वासात घेतले नाही’, या विधानापासून पवारांनी सुरूवात केली. पहिलाच बॉम्ब इतका जबरा होता, की ठाकरेंना घाम फुटला, सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांना पवारांची भेट घ्यावी लागली.
‘२०२४ मध्ये मविआ एकत्र लढेल काय, हे आताच कसे सांगणार? अजून जागा वाटपाची चर्चाही सुरू झालेली नाही’, हा दुसरा धक्का.
त्यानंतर ‘लोक माझे सांगाती’च्या प्रकाशन सोहळ्यात ‘मविआचे भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही’, हे अगदी ताजे विधान.
मविआचे सरकार असताना पवारांचे ठाकरेंशी उत्तम संबंध होते, म्हणून ते वारंवार आपले ज्येष्ठत्व बाजूला ठेवून ठाकरेंना भेटायला जात होते आणि आता ते संबंध बिघडलेत म्हणून ते टीका करतायत, असा काही मामला नाही. पवार हे पराकोटीचे स्थितप्रज्ञ आहेत. याला राजकारणातली प्रोफेशनलिझम म्हणतात. रात गई बात गयी…
सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची गरज होती. आता ती गरज संपली आहे. ठाकरेंसोबत जाऊन सत्ता मिळवता येणार नाही, हे स्पष्ट दिसते आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना खुंटीला टांगून ठेवण्याचा निर्णय बहुधा पवारांनी घेतलेला आहे.
उद्धव ठाकरेंच्या ही बाब लक्षात आलेली नाही, अशातला भाग नाही, परंतु ‘मरता क्या न करता’, अशी त्यांची अवस्था आहे. आज मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत, त्यांनी या आक्षेपावर उत्तर देताना अगदी बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
‘मी मुख्यमंत्री म्हणून जे काही केले ते जगजाहीर आहे, माझ्या बाजूने मविआला तडा जाणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. म्हणजे समोरचा लाथा घालत असताना एकनिष्ठतेच्या आणाभाका घेण्याची वेळ ठाकरेंवर आलेली आहे. भाजपासोबत युती असताना रोज उठून तोंडाचा पट्टा चालवणारे उद्धव ठाकरे हेच का? असा लोकांना प्रश्न पडावा.
हे ही वाचा:
मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा
एफआयआर दाखल झाले; सर्वोच्च न्यायालयातील कुस्तीगीरांचे प्रकरण संपले
शरद पवारच म्हणाले, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे दिल्लीच्या मनातही नाही!
मुंबईतील बिबटे माणसांसोबत जीवन जगू शकतील का?
कधी अजित पवार हे उद्धव ठाकरेंच्या पाठी मीडियाला डोळा मारायचे. थोरल्या पवारांनी तर थेट डोळे वटारले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर रोज शिउबाठाला तुडवतायत. संजय राऊत यांनी आमच्या पक्षाबाबत चोंबडेपणा करू नये, असे स्पष्टपणे त्यांनी बजावले आहे. मविआचा हनीमून संपल्याची ही लक्षणे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची चर्चा सुरू आहे, असा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसच्या मनात राष्ट्रवादी बाबत किती प्रचंड अविश्वास आहे, हे स्पष्ट करणारे हे वक्तव्य. १ मे ची वज्रमूठ सभा अखेरची असेल असे भाकीत भाजपा आमदार नीतेश राणे यांनी केले होते. ते प्रत्यक्षात येताना दिसते आहे. जूनपर्यंतच्या चार वज्रमूठ सभा रद्द झालेल्या आहेत. याचा अर्थ मविआत सर्वकाही आलबेल नाही. तिघात आधीच असलेला सावळा गोंधळ ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेने अधिक वाढवला आहे.
गेल्या तीन साडेतीन वर्षात महाराष्ट्रात एकेक धक्कादायक राजकीय घटना घडताना पाहायला मिळतायत. आताच उद्धव ठाकरे यांच्या कानठळ्या बसू लागल्या आहेत. २०२४ पर्यंत त्यांची स्थिती आणखीनच बिकट झालेली असेल.
ब्येष्ट मुख्यमंत्र्याचा बुरखा
हातभर आता फाटला आहे
पालखी खांद्यावर घेणाऱ्यांनीच
हा कोलदांडा घातला आहे. II
घरी बसून चमकण्याचे
दिवस आता गेले हो
लोक नाहीत सांगाती
हेही स्पष्ट झाले हो II
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)