बांगलादेशात सत्तापालट झाला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडले आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यावर संपूर्ण देश हादरला. देशाची कमान सध्या लष्करप्रमुखांच्या हाती आहे. नवीन सरकार स्थापनेचे प्रयत्न लवकरच सुरू झाले आहे. दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाच्या समन्वयकांनी नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच मोहम्मद युनूस यांना बांगलादेशचे पंतप्रधान करण्याची मागणीही जोर धरत आहे. मंगळवारी (६ ऑगस्ट) पहाटे फेसबुकवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांनी सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे.
कोण आहे मोहम्मद युनूस?
मोहम्मद युनूस यांचा जन्म २८ जून १९४० रोजी झाला. ते बांगलादेशातील एक सामाजिक उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ आणि सामाजिक नेते आहेत. गरीबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी युनूस यांना २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. युनूस यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. युनूस यांनी १९८३ मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली, जी गरीब लोकांना लहान कर्ज देते. बांगलादेशला त्याच्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून मायक्रोक्रेडिटसाठी जगभरात प्रशंसा मिळाली. त्यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश आले.
हे ही वाचा:
बांगलादेशातील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून मंदिर पेटवले
“बांगलादेशातील एक कोटी हिंदू निर्वासितांना आश्रय देण्यासाठी तयार राहा”
सत्ताधारी अवामी लीगचा खासदार मशर्फे मूर्तझाचे घर जाळले; नेते शाहीन चकलादार यांचे हॉटेल पेटवले
“शेख हसीना कदाचित बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत”
तसेच २००९ मध्ये त्यांना युनायटेड स्टेट्स प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले. २०१० मध्ये त्यांना काँग्रेसनल गोल्ड मेडल देण्यात आले. यासोबतच त्यांना इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, विशेष म्हणजे नोबेल पारितोषिक मिळविलेल्या मोहम्मद युनूस यांच्यावर २ दशलक्ष डॉलर्सच्या घोटाळ्याचाही आरोप आहे. तसेच कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या एका वेगळ्या प्रकरणात ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्याची जामिनावर सुटका झाली.