मशीद कमिटीची याचिका फेटाळली, ज्ञानवापीत पूजा सुरूच राहणार!

पुढील सुनावणी ६ फेब्रुवारीला

मशीद कमिटीची याचिका फेटाळली, ज्ञानवापीत पूजा सुरूच राहणार!

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजा करण्यास वाराणसी न्यायालयाने परवानगी दिली होती.वाराणसी न्यायालयाच्या आदेशाविरोधात ज्ञानवापी मशीद कमिटीने अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली.या याचिकेवर आज शुक्रवारी ( २ फेब्रुवारी) सुनावणी पार पडली.अलाहाबाद हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार देत मशीद समितीच्या याचिकेवरील सुनावणी ६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.

वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत ज्ञानवापी मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.मात्र, अलाहाबाद हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी या प्रकरणाची सुनावणी केली.यावेळी हायकोर्टानं वाराणसी कोर्टाच्या निर्णयाला स्थगितीचा अर्जही नाकारला आणि मशीद समितीला ६ फेब्रुवारीपर्यंत याचिकेत सुधारणा करण्यास सांगितले. यावेळी हायकोर्टाने मशीद समितीला सांगितले की, १७ जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिल्याशिवाय काहीही करता येणार नाही. तसेच मशिदीच्या आवारात आणि बाहेर कायदा सुव्यवस्था राखण्याचे आदेश महाधिवक्ता यांना दिले आहेत.

हे ही वाचा:

हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी

नीतीशकुमारनंतर ममता बॅनर्जीही ‘इंडिया’तून बाहेर पडण्याच्या तयारीत!

झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकार!

अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने पूजेवर बंदी घातलेली नाही. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला ही जागा जतन करण्यास सांगितले आहे. कोणतेही नुकसान किंवा बांधकाम होऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाची कोणतीही बंदी नसल्यामुळे तळघरात दर्शन व पूजा सुरू राहणार आहे. पुढील सुनावणीत मुस्लिम पक्ष १७ जानेवारी २०२४ च्या आदेशालाही आव्हान देणार आहे.

Exit mobile version