इतिहासात प्रथमच ‘रणजी चषक’ नाही

इतिहासात प्रथमच ‘रणजी चषक’ नाही

भारताच्या क्रिकेटमधील ऐतिहासीक अशा ‘रणजी चषक’ स्पर्धेवर यंदा कोरोनामुळे गंडांतर आले आहे. या महामारीमुळे यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच प्रथम दर्जाच्या क्रिकेटची रणजी चषक स्पर्धा होणार नसल्याचे ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’कडून जाहिर करण्यात आले आहे.

रणजी चषक सामन्यांची सुरूवात १९३४-३५ च्या हंगामात करण्यात आली होती. तिथपासून ते आजतागायत कधीही ही स्पर्धा रद्द करण्यात आली नव्हती. मोहनदास मेनन यांनी केलेल्या ट्वीटनुसार तर ही स्पर्धा दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानही खेळवली गेली होती, आणि देशांतर्गत क्रिकेट खेळवणारा भारत हा एकमेव देश होता.

एकाबाजूला रणजी चषक सामने जरी रद्द करण्यात आले असले तरीही दुसरीकडे, ५० ओव्हर्सच्या एकदिवसीय मालिकांची ‘विजय हजारे चषक’ स्पर्धा भरवण्यात येणार आहे.

त्याबरोबरच १९ वर्षांखालील मुलांची ‘विनू मंकड चषक’ स्पर्धा आणि महिलांची ५० ओव्हर्सच्या सामन्यांची स्पर्धा देखील बीसीसीआय या हंगामात आयोजित करत आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हे रणजी स्पर्धा आयोजित करण्यास उत्सुक होते. देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धांपैकी या स्पर्धेसाठी सर्वाधिक मानधन दिले जाते. साधारणपणे प्रत्येक खेळासाठी ₹१.५ लाख मानधन दिले जाते. मात्र स्पर्धेची लांबी कमी करुनही दोन टप्प्यांतील रणजी सामन्यांसाठी देखील दोन महिन्यांचे विलगीकरण शक्य नाही.

शाह यांनी राज्य क्रिकेट नियामक मंडळांना लिहीताना, ‘विजय हजारे चषक’, ‘विनू मंकड चषक’ आणि ‘महिलांच्या एकदिवसीय सामन्यां’बद्दल समाधान व्यक्त केले आहे. याबरोबरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार रणजी चषक रद्द करण्याचा निर्णय खेळाडू आणि इतर सर्वांसोबत झालेल्या चर्चेनंतर घेतला गेला आहे. त्याबरोबरच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना सामने रद्द झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई देखील दिली जाणार आहे.

Exit mobile version