गेल्या वर्षी म्हणजे २०२२मध्ये आसाममध्ये एकाही गेंड्याची शिकार झाली नाही, असे आसामचे मुख्यमंत्री हिमांता विश्वशर्मा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, यासंदर्भात कोणतीही तडजोड न करण्याचे कठोर धोरण राबविल्याचे हे परिणाम आहेत. त्यामुळे शिकार करणाऱ्यांची संख्या २०२२मध्ये शून्यावर आणण्यात आली आहे.
शर्मा यांनी सांगितले की, राज्यात २०२२मध्ये एकाही गेंड्याची शिकार शिकाऱ्यांकडून झाली नाही. गेल्या काही वर्षात हे शिकारीचे प्रमाण खाली आले होते, पण अगदी एक दोन घटना घडतच होत्या. मात्र आता हे प्रमाण शून्यावर आले आहे. हे एक शुभचिन्ह आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमांता विश्वशर्मा यांनी ट्विट करून आसामच्या वनखात्याचे कौतुक केले आहे. तसेच राज्य पोलिसांचेही आभार मानले आहेत. त्यांच्यामुळे गेंड्यासारख्या रुबाबदार प्राण्याचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘आपला पेहराव योग्य, उचित असावा एवढे सामाजिक भान बाळगले पाहिजे’
धरणबहाद्दराला गोमुत्र पाजा आंदोलनाने अजित पवारांचा निषेध
कंझावाला प्रकरणी तातडीने अहवाल सादर करा!
विश्वशर्मा म्हणतात की, २०२२ हे वर्ष गेंडा संवर्धन योजनेसाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. २०२१मध्ये २ गेंड्यांची शिकार झाली होती पण २०२२ला हे प्रमाण शून्यावर आले. आता गेंड्यासारखा प्राणी हा आसाममध्ये सुरक्षित आहे. आसाम वनविभाग, आसाम पोलिस यांचे आभार.
हिमांता विश्वशर्मा यांनी केलेल्या या ट्विटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. ही खूप महत्त्वाची बातमी आहे. आसामच्या जनतेचे यासाठी खूप आभार. गेंड्यांच्या संरक्षणासाठी लोकांनी जे प्रयत्न केले त्यांचेही आभार. असे पंतप्रधान मोदींनी कौतुकोद्गार काढले आहेत.
एकशिंगी गेंड्याची शिकार विशेषतः काझिरंगा नॅशनल पार्कमधून केली जात होती. गेंड्याचे शिंग कापून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्यासाठी या शिकाऱ्यांकडून गेंड्यांची सर्रास हत्या होत असे. सध्या काझिरंगामध्ये २६१३ गेंडे आहेत. आता सरकारकडून गेंड्यांच्या संवर्धनाची काळजी घेतली जात असल्यामुळे त्यांची संख्या वाढते आहे.