माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रांची कसोटीदरम्यान ध्रुव जुरेल याची एमएस धोनीशी तुलना केली होती. मात्र भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण देताना ‘कोणीही एमएस धोनी होऊ शकत नाही,’अशा शब्दांत आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे.
रांची कसोटी सामन्यादरम्यान सुनील गावस्कर यांनी यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल याच्या खेळीचे कौतुक करताना ‘आणखी एक एमएस धोनी तयार होत आहे…’ असे वक्तव्य केले होते. मात्र धरमशाला येथे होत असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांना धोनी आणि जुरेल यांच्यामधील साम्यस्थळांबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘कोणीच दुसरा धोनी होऊ शकत नाही, मात्र जुरेलचे भविष्य उज्ज्वल आहे, हे त्याने दाखवून दिले आहे,’ असे गावस्कर म्हणाले.
हे ही वाचा:
भाजपची केरळवर नजर; मंत्र्यांसह उतरवले प्रसिद्ध चेहरे!
आण्विक शस्त्रांचं साहित्य पाकमध्ये नेणाऱ्या चीनी जहाजाला मुंबईत रोखलं
… अन् मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू
‘ज्या प्रकारे तो खेळाचा विचार करतो, ज्या प्रकारे तो परिस्थितीची पाहणी करतो आणि फलंदाजी करतो, त्यामुळे मला एमएस धोनीची आठवण येते. तो सुद्धा मध्येच एखादा षटकार ठोकून पुन्हा एक-दोन धावा करून समोरच्या फलंदाजालाही संधी देऊन धावफलक हलता ठेवत असे. तसेच, यष्टीरक्षणातही त्याने चांगली चमक दाखवली आहे. त्याने ज्याप्रकारे चेंडू अडवून बेन डकेटची विकेट घेतली आणि जिम्मी अँडरसन याचा अप्रतिम झेल घेतला, हे विलक्षण होते.
जेव्हा एमएस धोनी त्याच्या वयाचा होता, तेव्हाही तो याचप्रमाणे परिस्थितीबाबत सजग असे. त्यामुळेच मी जुरेल हा धोनीप्रमाणे असल्याचे म्हटले होते. कोणीच एमएस धोनी होऊ शकत नाही. धोनी हा एकमेव आहे. परंतु ध्रुव याने जर धोनीच्या कौशल्याचा काही भाग जरी आत्मसात केल्यास ते भारतीय क्रिकेटच्या फायद्याचे ठरेल,’ असे गावस्कर म्हणाले.