पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया चषक २०२३ चे आयोजन करणार आहे. मात्र, आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) याबाबत वक्तव्य केले की, भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी आला नाही तर पीसीबी २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ पाठवणार नाही. या सर्व प्रकरणावर आता केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“हा विषय बीसीसीआयकडे आहे आणि ते यावर भाष्य करतील. भारत क्रीडा क्षेत्रात महासत्ता आहे, भारतात अनेक विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकही भारतात होणार असून जगभरातील सर्व मोठे संघ त्यात सहभागी होतील,” असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
पीसीबीच्या पत्राला बीसीसीआय उत्तर देईल आणि २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक भारतातच होणार आहे. पुढील वर्षीही विश्वचषक होणार असून जगभरातील संघही खेळणार आहेत. भारताला कोणाचेही ऐकण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर अनुराग ठाकूर यांनी दिले आहे.
हे ही वाचा:
पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस
पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक
भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा
समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल
“आज भारत कोणत्याही क्षेत्रात नाकारला जाऊ शकत नाही आणि क्रिकेट जगतात मोठे योगदान आहे. विश्वचषक भारतात होणार आहे, तो भव्य आणि ऐतिहासिक असेल. पाकिस्तानमध्ये सुरक्षेची चिंता असल्याने गृह मंत्रालय निर्णय घेईल. इंग्लंड- ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला भेट दिली, पण त्यांची भारताशी तुलना करता येईल का? असा सवालही अनुराग ठाकूर यांनी केला आहे.