खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारतीय सरकारी एजंटांचा सहभाग असल्याच्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय, हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावले आहे. सध्या जयशंकर हे पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या जी-२० शिखर परिषदेनंतर दोन्ही देशांमधील हा वरिष्ठस्तरावरील संवाद आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंधांमधील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘दहशतवाद आणि हिंसाचाराला कॅनडाचे मिळणारे समर्थन ही प्रमुख समस्या आहे. आम्ही एक लोकशाही राष्ट्र आहोत. भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही. त्यांचे भाषण स्वातंत्र्य हिंसाचाराला उत्तेजन देणारे आहे. आमच्यासाठी तो स्वातंत्र्याचा गैरवापर आहे, स्वातंत्र्याचे संरक्षण नाही,’ अशा शब्दांत त्यांनी कॅनडावर टीका केली.
सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावरील हल्ला आणि कॅनडातील खलिस्तानी धमकीच्या पोस्टर्सवर ते बोलत होते. ‘तुमच्या दूतावासावर, तुमच्या कार्यालयावर, तुमच्या माणसांवर हल्ले होणार असतील तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?’, असा प्रश्नच जयशंकर यांनी उपस्थित पत्रकारांना विचारला.
निज्जरच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून मतभेद कसे दूर करता येतील, हे भारत आणि कॅनडा यांना एकमेकांशी बोलून पाहावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या राजनैतिक वादावर त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांच्याशी चर्चा केली.
कॅनडाने भारताविरुद्ध केलेल्या आरोपांच्या पुराव्याबाबत त्यांना विचारले असता, ‘ते आरोपांच्या पुराव्याचे तपशील आणि कोणतीही संबंधित माहिती सामायिक करण्यास तयार असतील तर आम्ही ते पाहण्यासही तयार आहोत,’ असे त्यांनी सांगितले. ‘भारतात हिंसाचार आणि बेकायदा कारवायांमध्ये स्पष्टपणे सहभागी असलेल्या काही व्यक्ती आणि संघटना कॅनडात आहेत. या संदर्भात काही जणांचे प्रत्यार्पण करण्याची विनंतीही आम्ही कॅनडाकडे केली आहे. मात्र त्यांनी आमच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. दहशतवाद आणि हिंसाचाराला कशाप्रकारे कॅनडात आश्रय दिला जातो, हेच यावरून अधोरेखित होते,’ याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधले.
‘आमच्या दूतावासावर ‘स्मोक बॉम्ब’ फेकले गेले आहेत, वाणिज्य दूतावासांसमोर हिंसाचार झाला आहे, पोस्टर्स लावले आहेत. तुम्ही ही बाब सर्वसाधारण मानता का? हे इतर कोणत्याही देशात घडले असते तर त्यांची प्रतिक्रिया कशी असती. ही काही सर्वसाधारण बाब नाही. कॅनडामध्ये जे घडत आहे, ते इतरत्र कुठेही घडले असते तर जगाने ते त्याच समभावनेने स्वीकारले असते का?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
१७ वर्षीय पलकने सुवर्ण तर ईशा सिंगने रौप्यपदकावर कोरले नाव !
पुणेकर सुनील देवधरांचे वाढदिवसानिमित्त प्रशांत कारुळकरांकडून अभिष्टचिंतन
इम्रान खानचे वकील आणि पीएमएल-एन सिनेटर यांच्यात टीव्ही शोमध्ये ठोसेबाजी
मनीष मल्होत्रा डिझाइन करणार एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे गणवेश
‘भारतीय दूतावासातील कर्मचारी-अधिकारी वर्ग कॅनडातील भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात जातात तेव्हा ते ‘असुरक्षित’ असतात. त्यांना उघडपणे धमकावले जाते. त्यामुळेच मला कॅनडामधील व्हिसाप्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यास भाग पाडले गेले,’अशीही माहिती त्यांनी दिली.
‘सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आमचा दूतावास आणि आमचे राजनैतिक कर्मचारी यांना कॅनडामध्ये सातत्याने धमकावले गेले आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत त्यांना त्यांचे काम चालू ठेवणे खरोखरच त्यांच्यासाठी सुरक्षित नाही,’ असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.